दीपक खिलारे
इंदापूर : कर्मयोगी शंकरराव भाऊंची एक वैचारिक बैठक होती. भाऊंनी आयुष्यामध्ये सर्व जाती-धर्माच्या सामान्य माणसांना बरोबर घेऊन जाण्याचे सामाजिक कार्य केले आहे. त्यांनी आपल्या आयुष्यात राजकारणापेक्षा समाजकारणाला जास्त महत्व दिले असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी केले. माजी खासदार, कर्मयोगी शंकररावजी पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी हर्षवर्धन पाटील बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, सन 1957 च्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये भाऊंनी आपली वैयक्तिक भूमिका मांडली होती. नंतर झालेल्या निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसचे केवळ सहा लोक निवडून आले होते. त्यात सर्वाधिक बहुमताने भाऊ निवडून आले. आपल्या आयुष्यात राजकारणापेक्षा जास्त समाजकारण केले. अनेकांचे संसार प्रपंचे आयुष्य उभे केले.
रचनात्मक विकासाचे काम करून शाश्वत विकास केला. या इंदापूरच्या भूमीत त्यांचे नाव कायम घेतले जाईल. भाऊंनी त्यांच्या आयुष्यात विजयाचा आणि पराभवाचा कधी विचार केला नाही. स्वाभिमानाने सत्याचा नेहमी विचार केला असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाजप युवा मोर्चा कोअर कमिटीचे प्रमुख राजवर्धन पाटील तसेच राष्ट्रवादीचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, शिवसेनेचे नेते विशाल बोंद्रे, बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव ॲड. राहुल मखरे व इतर मान्यवर उपस्थित होते.