वाघोली, (पुणे) : थेऊर – लोणीकंद रस्त्यावर मालवाहू कंटेनर आणि इको कार गाडीची समोरासमोर धडक झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हि घटना केसनंद (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील जोगेश्वरी माता मंदिराच्या जवळ रविवारी (ता.२८) रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. तर जखमी मधील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
गणेश सुखलाल जाधव (वय-३५), विनोद तुकाराम भोजणे (वय-३६), विठ्ठल प्रकाश जोगदंड (वय -३६, तिघे रा. एलएनटी फाटा, सणसवाडी, सोलापूर रस्ता) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी ट्रकचालक मच्छिंद्र तुकाराम जाधव (रा. गावठाण, काराठी, ता. बारामती) याच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत बाळचंद्र शिवाजी पांचाळ (वय-३६, रा. बालाजी पार्क, केसनंद रस्ता, वाघोली, मूळ रा. कौठाळा, जि. लातूर) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश जाधव यांनी नवीन कार खरेदी केली होती. कार खरेदी केल्यानंतर गणेश आणि त्यांचे मित्र श्री चिंतामणी मंदिरात दर्शनासाठी रविवारी आले होते. रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास दर्शन घेऊन ते मोटारीतून लोणीकंद-थेऊर रस्त्याने निघाले होते. त्यावेळी जोगेश्वरी मंदिरासमोर भरधाव ट्रकने मोटारीला समोरुन जोरदार धडक दिली.
या अपघातात कारच्या पुढील भागाचा चक्काचुर झाला. यामध्ये गणेश आणि त्यांचे मित्र गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ट्रकचालकाला ताब्यात घेतलं असून गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.