दौंड : दौंड तालुक्यातील अनेक गावांमध्ये पावसाने हजेरी लावल्याने बळीराजाने पेरणीपूर्व मशागतीची कामे उरकून घेतली आहेत. खरीप हंगामातील पेरणीला वेळ असला, तरी तालुक्यातील विविध भागात उसाची लागण करण्याला वेग आला आहे.
कमी खर्च व रोप उगवण्याची विश्वासार्हता यामुळे दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांचा कल रोपवाटिकेतून आणलेले उसाचे रोप लावण्याकडे दिसत आहे. दर वर्षी पारंपरिक पद्धतीने उसाचे बेणे शेतीमध्ये अंथरूण उसाची लागवड केली जायची. अलीकडील काळामध्ये उती संवर्धन करून वापरलेली उसाची रोपे लावण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसत आहे.
उसाच्या बेण्यासाठी प्रतिटनाला ३५०० रुपये बाजार भाव आहे. एक एकर लागवडीसाठी दीड ते पावणे दोन टन बेणे वापरावे लागते. याशिवाय ऊस लागवडीसाठी मजुरीचा खर्च प्रतिएकर ६००० रुपये आहे. याशिवाय बेसल डोससाठी चार हजार रुपये खर्च येतो. बेणे लागवड केल्यापासून कोंब फुटण्यासाठी २१ दिवस लागतात.
या दरम्यान जास्त पाऊस झाल्यास, उसाचे टिपरू जास्त खोलवर दाबले गेल्यास, उसाचा कोंब येण्यासाठी असणारा डोळा खराब असल्यास शेतामध्ये उसाची लागवड एक समांतर होत नाही. त्यामुळे दुबार पद्धतीने उसाच्या बेण्याची लागवड करावी लागते. परंतु उती संवर्धन करून वापरलेली रोपे पावसामुळे खराब होण्याचे प्रमाण कमी असते. यासाठी वापरण्यात येणारे बेणे हे दर्जेदार असल्याने दर्जेदार ऊस उत्पादन निघते.
यातच एका रोपाची किंमत 2 रुपये 40 पैसे अशी असते. म्हणजे एकरी 5 ते 6 हजार रोपे लागतात. याचा खर्च 12 हजर ते 14 हजारपर्यंत येतो. तसेच नर्सरीतील रोपे ऊस प्रजनन संस्था कोइमतूर येथून आयात केले असल्याने त्यांची विश्वासार्हता दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातुन 86032 या जातीच्या रोपांना शेतकरी जास्त प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे स्वतः चे पाणी उपलब्ध आहे. अशा शेतकऱ्यांनी उसाची रोपे लागवड सुरू केली असल्याचे चित्र दौंड तालुक्यात दिसत आहे.
पूर्वी शेती म्हणजे उपजीविकेचे साधन म्हणून पाहिले जायचे. आजकाल शेतीकडे मुख्य व्यवसाय म्हणून पाहिले जात आहे. आधुनिक तंत्रज्ञान आल्याने शेतकऱ्यांचा उसाच्या बेण्याऐवजी उसाच्या रोपाकडे कल वाढला आहे.
– नामदेव ठोंबरे, ठोंबरे रोपवाटिका नाथचीवाडी (दौंड)