उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन येथील ‘डॉ. अस्मिता प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय’ येथील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी मंथन राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन करून विद्यालयाच्या उच्च शैक्षणिक गुणवत्तेचा पुन्हा एकदा ठसा उमटवला आहे.

स्पर्धा परीक्षेच्या युगात अगदी लहान वयातच या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या उत्तुंग यशाने संपूर्ण उरुळी कांचन परिसरात व शैक्षणिक वर्तुळात त्यांचे जोरदार कौतुक केले जात आहे. मंथन स्पर्धा परीक्षेत विद्यालयातील इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे विश्वम मुकुंद दगडे याने मंथन स्पर्धा परीक्षेत राज्यस्तरावर 8 वा क्रमांक आणि जिल्हास्तरावर 3 रा क्रमांक पटकावून अभूतपूर्व यश मिळवले.आयुष सतीश बाबर याने संपूर्ण केंद्रामध्ये प्रथम क्रमांक मिळवून अव्वल स्थान संपादन केले.

विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या उल्लेखनीय यशामागे त्यांची मेहनत, पालकांचे सातत्यपूर्ण प्रोत्साहन आणि विद्यालयातील शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन यांचा मोठा वाटा असल्याचे विद्यालयाच्या वतीने सांगण्यात आले.

या यशाबद्दल संस्थाध्यक्ष, सर्व संचालक मंडळ, विद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, सर्व शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांनी गुणवंत विद्यार्थी विश्वम दगडे व आयुष बाबर यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी भविष्यातही शैक्षणिक क्षेत्रात अशीच गगनभरारी घ्यावी, यासाठी विद्यालय परिवाराने त्यांना शुभेच्छा दिल्या.







