उरुळी कांचन : भाळी चंदनाचा टिळा लावून मुखी हरिनामाचा जयघोष करत उरुळी कांचन (ता. हवेली) येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिरात शनिवारी (ता. 13) बाल वारकरी अवतरले. वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुले, श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी मिरवणूक आणि विठू नामाचा गजर अशा विठ्ठलमय वातावरणात विद्यार्थ्यांचा दिंडी सोहळा रंगला.
बाळ गोपाळांच्या स्वरूपात भक्तीमय वातावरणात पालखी सोहळा साजरा झाला. वैष्णवांचा मेळावा भरल्याप्रमाणे शाळेला स्वरूप प्राप्त झाले होते. डोक्यावर टोपी, कपाळी केशरी गंध, गळ्यात टाळ घेतलेले विद्यार्थी, नऊवारीत नटून-थटून डोक्यावर तुळस घेऊन आलेल्या विद्यार्थीनींना पाहून विठ्ठल नामाची शाळा भरल्याचा प्रत्यय आला.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अभंग स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. या पालखी सोहळ्यात नर्सरी ते इयत्ता नववीपर्यंतचे विद्यार्थी पारंपारिक वेशभूषेत सहभागी झाले होते. विविध संतांच्या वेशभूषा मुलांनी परिधान केल्याने भक्तीमय वातावरणात सोहळा साजरा झाला. दिंडी, पालखी व वारकरी असा रंगतदार पालखी सोहळा व विठू-नामाच्या जयघोषात बालगोपाळांनी परिसर दुमदुमून गेला. हा दिंडी सोहळा ग्रामपंचायत हद्दीतून आश्रम रोड मार्गे राम मंदिरामध्ये पूजा व आरतीसाठी विसावला.
दरम्यान यावेळी राम मंदिरात अभंग स्पर्धा पार पडल्या यावेळी राम मंदिराचे विश्वस्त व स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानचे पदाधिकारी यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले. यावेळी विद्यालयातील मुख्याध्यापिका ज्योती भोसले, सरिता राऊत, मार्गदर्शक शिक्षक राम चव्हाण, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी दिंडी सोहळ्यासाठी परिश्रम घेतले. अशा भक्तिमय वातावरणात दिंडी चौकातून हरिनामाचा गजर करीत पुन्हा विद्यालयाच्या प्रांगणात आली. यावेळी मुलांना विद्यालयात खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.