Daund News : दौंड, (पुणे) : पती – पत्नीला बेदम मारहाण करून अज्ञात चोरट्यांनी जीवे मारण्याची धमकी देत २ लाख ८४ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना लिंगाळी (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीतील लोंढे मळा परिसरात बुधवारी (ता. २४) मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
२ लाख ८४ हजार रूपयांचा ऐवज लंपास
मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश यांचा पाणी फिल्टरचा व्यवसाय असून त्यांचे वडील आजारी असून त्यांच्या उपचारासाठी आई, बहीण यांना सोबत घेऊन तिघांना आळंदी येथील इंद्रायणी हॉस्पिटलमध्ये सोडले होते. रोजच्याप्रमाणे रात्री जेवण करून अविनाश त्यांची पत्नी कोयल, मुलगा रियांश हे सर्वजण घरात झोपले होते.
रात्री दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाज्यावर लाथ मारून दरवाजा तोडला. घरात प्रवेश केला. यादरम्यान पती – पत्नीला मारहाण करीत शांत बसण्यास सांगितले. कपाट उघडून कपडे अस्ताव्यस्त फेकून सोन्याचे मंगळसूत्र, रोख रक्कम जबरीने काढून घेतले. यावेळी अविनाश त्यांचा मुलगा व पत्नी या तिघांना अंगावर पांघरुन घेऊन झोपण्यास सांगितले. चोरटे घरातील इतर खोल्यात चोरी करण्यासाठी गेले. पांघरुन काढून पाहिल्यावर चोरटयांनी पुन्हा दांडक्याने मारहाण केली.
अविनाश म्हणाला, ‘आम्हाला मारु नका तुम्हाला जे पाहीजे ते सर्व देतो. पुन्हा चोरट्यांनी घरातील बेडरुमचे दरवाजे तोडून इतर ठिकाणी शोधाशोध सुरू केली.’ तिथे झोपलेल्या बेडरुमचा दरवाजाला कडी लावून चोरटे फरार झाले. हा प्रकार वत्रे यांनी फोनवरून आजूबाजूला राहणाऱ्यांना सांगितले.
सदर घटनेची दौंड पोलिसांना माहिती मिळताच दौंडचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. या घटनास्थळी बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव, पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.