पुणे : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बऱ्याच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधानसभेसाठी सर्वच पक्षांनी जोरात तयारी सूरु केली आहे. अशातच आता शिरूर लोकसभेचे माजी खासदार आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे लोकसभेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिवसेनेत परत यावं अशी विनंती कार्यकर्त्यांनी केली आहे.
आढळराव पाटील यांच्या लांडेवाडी येथील जनता दरबारावेळी शिवसेना शिंदे गटाचे हवेली तालुका अध्यक्ष विपुल शितोळे यांनी आढळराव पाटील यांना पुन्हा स्वगृही परतण्याची विनंती केली. त्यामुळे आढळराव आता परत स्वगृही जाणार का? याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
आढळराव पाटील यांनी लांडेवाडी येथे जनता दरबार भरवला होता. त्यावेळी शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांना परत पक्षात येण्याची विनंती केली आहे. आम्हाला तुमची गरज असून दादा तुम्ही परत या अशी आर्त हाकच कार्यकर्त्यांनी आढळराव पाटील यांना मारली. यावेळी कार्यकर्त्यांचं प्रेम बघून आढळराव पाटीलही भारावून गेले होते.