उरुळी कांचन, (पुणे) : आर.ओ. प्लॅन्टचे (R.O Plant) बाकी असलेले पैसे मागितल्याचा राग मनात धरून क्रेन व्यावसायिकाच्या बोटाला चावा घेऊन बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी (ता.17) रात्री सव्वा आठ ते साडेआठ वाजण्याच्या सुमारास शिंदवणे (ता. हवेली) हद्दीतील हॉटेल जगदंब येथे ही घटना घडली. याप्रकरणी तिघांवर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चंद्रकांत जालिंदर कुंजीर (वय-38, व्यवसाय- क्रेन व्यवसाय, रा. वळती, ता. हवेली) असे मारहाण झालेल्या इसमाचे नाव आहे. तर कृष्णा बापूसाहेब जाधव (रा. श्रीकृष्ण मंदिरापाठीमागे, उरुळी कांचन), अजय चव्हाण व गणेश चव्हाण (दोघे रा. शिंदवणे रोड, प्राईम प्लस हॉस्पिटलजवळ, उरुळी कांचन, ता. हवेली) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चंद्रकांत कुंजीर हे ‘श्री तुकाई भैरवनाथ टोईंग अँड क्रेन सर्व्हिस’ चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. शुक्रवारी (ता.17) रात्री सव्वा आठ ते साडेआठ वाजण्याच्या सुमारास चंद्रकांत कुंजीर हे शिंदवणे हद्दीतील ‘हॉटेल जगदंब’ येथे जेवण करण्यासाठी गेले होते. त्यावेळी तिथे कृष्णाजाधव हा देखील उपस्थित होता. चंद्रकांत यांनी कृष्णाकडे त्यांचे बाकी असलेले आर.ओ. प्लॅन्टचे 5 हजार रुपये मागितले.
पैसे मागताच कृष्णा जाधव याने चिडून अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्याने हाताने मारहाण करत चंद्रकांत यांच्या तोंडाला डाव्या बाजूला जोरात बोचकारले, तसेच उजव्या हाताच्या अंगठ्याशेजारील दोन बोटांना दाताने जोरात चावा घेतला. या चाव्यामुळे बोटातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव सुरू झाला. वाद वाढू नये म्हणून चंद्रकांत तिथून दुखापत झालेल्या अवस्थेत आपल्या दुचाकीवरून वळती येथील घराकडे जाण्यास निघाले.
यावेळी कृष्णा जाधव याने त्याचे भाचे अजय चव्हाण आणि गणेश चव्हाण यांना फोन करून माहिती दिली. यावेळी चंद्रकांत कुंजीर हे वळती फाट्यावरून जात असताना या दोन्ही भाच्यांनी त्यांना रस्त्यात अडवले. तेवढ्यात पाठीमागून आलेला कृष्णा जाधव या तिघांनी मिळून भररस्त्यात चंद्रकांत यांना अश्लील शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून दुखापत केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, चंद्रकांत कुंजीर यांनी औषधोपचार केल्यानंतर उरुळी कांचन पोलिसांत तिघांविरुद्ध तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी विविध कलमान्वये तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस हवालदार उद्धव गायकवाड करीत आहेत.







