बारामती, ता. 23 : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या मतदानाच्या पूर्वसंध्येला बारामती शहर पोलिसांनी बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणाऱ्याविरुद्ध कारवाई केली. टी. सी. कॉलेज परिसरात लाल रंगाच्या स्विफ्ट कारमध्ये गावठी पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे आढळून आली. या प्रकरणी आदित्य शेलार (रा. आमराई, बारामती) याला अटक करण्यात आली असून, पिस्तूल आणि कारसह एकूण 2 लाख 26 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (ता. 22) रात्री आठच्या सुमारास पोलीस शिपाई अक्षय सिताफ यांना गोपनीय माहिती मिळाली. आदित्य शेलार हा लाल रंगाच्या स्विफ्ट कारमधून टी. सी. कॉलेज परिसरात बेकायदेशीर अग्निशस्त्र घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रभारी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक मनीषा ओमासे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

रात्री साडेआठच्या सुमारास आठ नंबर ग्राउंडजवळील मोरया पॅलेस इमारतीसमोरील सार्वजनिक रस्त्यावर संशयित कार आढळली. दोन पंचांच्या उपस्थितीत वाहनाची तपासणी केली असता चालकाच्या सीटजवळ देशी बनावटीचे गावठी पिस्तूल आणि त्याच्या मॅगझीनमध्ये एक जिवंत काडतूस सापडले. त्यानंतर शेलार याची अंगझडती घेतली असता त्याच्या जॅकेटच्या खिशात आणखी दोन जिवंत काडतुसे मिळाली. शस्त्र बाळगण्याचा परवाना नसल्याचेही त्याने सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या कारवाईत 25 हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल, 1 हजार 200 रुपये किमतीची तीन जिवंत काडतुसे आणि दोन लाख रुपये किमतीची स्विफ्ट कार, असा एकूण 2 लाख 26 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
शस्त्राचा पुरवठा करणाऱ्याचा शोध सुरू
याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीत हे पिस्तूल मयूर मोरे (रा. मेडद, ता. बारामती) याच्याकडून मिळाल्याचे आरोपीने सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानुसार शस्त्राचा मूळ स्रोत आणि त्याच्या पुरवठ्यात इतरांचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या समन्वयातून पोलीस हवालदार ज्ञानदेव क्षीरसागर, पोलीस शिपाई कवितके, अक्षय सिताफ आणि पोलीस हवालदार अभिजीत कांबळे यांनी हि कामगिरी केली. पुढील तपास पोलीस हवालदार ज्ञानदेव क्षीरसागर करीत आहेत.







