पुणे : राज्यात यंदा पावसाचे प्रमाण अपुरे राहिल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. अनेक जिल्ह्यांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेत केंद्र शासनाच्या मदतीची प्रतीक्षा न करता, दिवाळीपूर्वी राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 5000 रुपये अग्रीम मदत जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी 4 नोव्हेंबरपूर्वी राज्यातील दुष्काळी भागांमधील सुमारे 92 लाख शेतकऱ्यांना ही मदत मिळणार असून थेट बँक खात्यात पैसे जमा केले जातील. यासाठी कोणतीही किचकट किंवा वेळखाऊ ई-केवायसी प्रक्रिया करावी लागणार नाही, ज्यामुळे मदत मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही. पंचनाम्यादरम्यान गोळा केलेल्या शेतकऱ्यांच्या अॅग्रीस्टॅक क्रमांकावरून ही रक्कम खात्यात हस्तांतरित केली जाईल.

सध्या राज्य सरकारने विविध विभागांच्या खर्चाला 20 टक्के कात्री लावली असून, हा बचत झालेला निधी दुष्काळ निवारणासाठी आणि शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी वापरण्यात येणार आहे. तसेच दिवाळीनंतर केंद्र सरकारकडून आपत्ती निवारणाचा निधी प्राप्त झाल्यावर उर्वरित नुकसान भरपाई देखील शेतकऱ्यांना दिली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रदीर्घ दुष्काळामुळे राज्यातील 305 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. या भागातील शेतकऱ्यांची पिण्याच्या पाण्याची आणि जनावरांच्या चारा-पाण्याची समस्या तातडीने सोडवली जात असून, या दिलासादायक निर्णयामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे.






