शेवाळवाडी, ता. 23 : पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील 15 नंबर चौकाजवळील लक्ष्मी कॉलनीसमोरील कॅनॉलजवळ झालेल्या दुचाकी अपघातात डिलिव्हरी बॉयचा मृत्यू झाला. 21ऑक्टोबर रोजी मध्यरात्री दीडच्या सुमारास हा अपघात घडला. भरधाव दुचाकीने धडक दिल्यानंतर संबंधित चालकाने जखमीला वैद्यकीय मदत न करता घटनास्थळावरून पळ काढल्याचा आरोप मृताच्या नातेवाइकाने केला आहे. याप्रकरणी मांजरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

भैया नवनाथ जाधव (वय 22) असे मृत्यू झालेल्या डिलिव्हरी बॉयचे नाव आहे. तर प्रीतम कानिफनाथ अवताडे (वय 27, रा. तुकाई दर्शन, फुरसुंगी, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भैया जाधव हा पुणे शहरात स्विगी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. 21ऑक्टोबरच्या रात्री डिलिव्हरी देऊन तो शेवाळवाडीच्या दिशेने गोपाळपट्टी येथील आपल्या घरी दुचाकीवरून जात होता. त्यावेळी 15 नंबर चौकाजवळील लक्ष्मी कॉलनीसमोरील कॅनॉल परिसरात त्याच्या दुचाकीला दुसऱ्या दुचाकीने समोरून धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या भैया याला उपचारासाठी ससून रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

मृताच्या नातेवाइकाने दिलेल्या तक्रारीनुसार, प्रीतम अवताडे हा एमएच 12 एक्सएफ 0243 क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या व्हेस्पा दुचाकीवरून जात होता. त्याने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे दुचाकी चालवत भैया जाधव याच्या दुचाकीला धडक दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.अपघातानंतर जखमीला कोणतीही वैद्यकीय मदत न करता तो घटनास्थळावरून निघून गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी संबंधित दुचाकीस्वाराविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी मृताच्या नातेवाइकाने केली आहे. अपघाताच्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.






