हडपसर, ता. 23 : कौटुंबिक वादातून जावयाने सासऱ्याच्या घरासमोर उभ्या असलेल्या दोन दुचाकींना आग लावून नुकसान केल्याचा आरोप समोर आला आहे. हडपसरमधील कामठे वस्ती, माळवाडी परिसरात बुधवारी (ता. 21) मध्यरात्री ही घटना घडली आहे. हडपसर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023 – 326(c),326(f) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अफसर गुलाब शेख (वय 55) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार जावई श्रीरंग सोपान गवलवाड (वय 30) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांत दिलेल्या माहितीनुसार, अफसर शेख हे पत्नी सुलताना यांच्यासह कामठे वस्ती येथे राहतात. त्यांची मुलगी खुशबू हिचे पती श्रीरंग गवलवाड हे त्यांच्या घराशेजारी भाड्याने राहतात. श्रीरंग यांना दारू पिण्याची सवय असून, त्यांच्यात आणि कुटुंबीयांमध्ये वारंवार वाद होत आहेत. तसेच श्रीरंग हे शिवीगाळ करून दुचाकी जाळण्याच्या धमक्या देत असल्याचा आरोपही शेख यांनी केला आहे.

बुधवारी रात्री शेख दाम्पत्य जेवण करून झोपले होते. मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास पत्नी सुलताना यांना जळल्याचा वास आला आणि धूर दिसला. त्यांनी पतीला उठविल्यानंतर दोघेही घराबाहेर आले. त्यावेळी घरासमोर उभ्या असलेल्या लाल रंगाच्या टीव्हीएस अपाचे आणि काळ्या रंगाच्या बजाज डिस्कव्हर या दोन्ही दुचाकींना आग लागल्याचे दिसले. याचवेळी श्रीरंग गवलवाड हे मुख्य रस्त्याच्या दिशेने पळून जाताना दिसल्याचा दावा फिर्यादीने केला आहे.

शेख दाम्पत्याने शेजाऱ्यांच्या मदतीने पाणी टाकून आग विझवली. मात्र, या आगीत दोन्ही दुचाकींची सीट, हेडलाईट, हँडल, वायरिंग आणि टायरचे नुकसान झाले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पुढील तपासात घटनेची वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.






