लोणीकंद, ता. 23 : लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खंडोबा माळ परिसरात मोकळ्या माळरानावर गांजा ओढत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. बुधवारी (ता. 21) रात्री साडेआठच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या वेळी गांजा ओढण्यासाठी वापरण्यात येणारी चिलीम, लायटर आणि गांजासदृश पदार्थ असलेली प्लास्टिकची पिशवी जप्त करण्यात आली.

महेश विलास मुरकुटे (वय 25, मूळ रा. मुरकुटवाडी, ता. आंबेजोगाई, जि. बीड), संदीपकुमार रामाअवतार त्रिपाठी (वय 28, मूळ रा. गडहरा, जि. सिधी, मध्य प्रदेश) आणि यश गोविंदसिंग चंदेल (वय 24, मूळ रा. अमरावती) असे ताब्यात घेण्यात आलेल्या तिघांचे नाव आहे. हे तिघेही सध्या वाघोली परिसरात भाड्याने राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या आदेशानुसार अंमली पदार्थांची विक्री व सेवन करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी तपास पथक गस्त घालत होते. या वेळी खंडोबा माळ परिसरातील मोकळ्या जागेत तीन जण काहीतरी ओढत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांना पाहून त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र पथकाने त्यांना पकडून ताब्यात घेतले.

पोलिसांनी तपासणी केली असता महेश मुरकुटे याच्याकडे चिलीम व कापडाचा तुकडा, यश चंदेल याच्याकडे हिरव्या रंगाचे लायटर, तर संदीपकुमार त्रिपाठी याच्याकडे गांजासदृश पदार्थ असलेली प्लास्टिकची छोटी पिशवी आढळली. संबंधित पदार्थ आणि साहित्य पंचांसमक्ष जप्त करून स्वतंत्र कागदी लिफाफ्यांत सीलबंद करण्यात आले.
ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक गजानन कागणे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार जाधव, जगताप, पोलीस शिपाई शिवले, मरकड आणि ढमढेरे यांच्या पथकाने केली. ताब्यात घेतलेल्या तिघांना पुढील कार्यवाही व वैद्यकीय तपासणीसाठी लोणीकंद पोलीस ठाण्यात आणण्यात आले.






