उरुळी कांचन, (पुणे): पुणे जिल्हा क्रीडा संचालनालय आणि टी. सी. कॉलेज, बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय टेनिक्वाइट स्पर्धेत उरुळी कांचन (ता. हवेली) येथील महात्मा गांधी विद्यालय व ज्युनिअर कॉलेजने घवघवीत यश संपादन केले.

विद्यालयाच्या 14, 17, व 19 वर्षांखालील मुलांच्या संघांसह 14 व 19 वर्षांखालील मुलींच्या संघांनी विजेतेपद पटकावत जिल्ह्यात आपले वर्चस्व सिद्ध केले. या पाचही संघांची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

बारामती येथे 17 व 18 ऑक्टोबर 2026 रोजी या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विविध वयोगटांत विद्यालयाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्धी संघांवर मात केली. या यशामुळे विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

दरम्यान, या खेळाडूंना क्रीडा शिक्षक शेखर शिंदे आणि विमल कांचन यांनी मार्गदर्शन केले. खेळाडूंच्या यशाबद्दल प्राचार्य संगीता शिर्के यांनी अभिनंदन केले. तसेच आगामी विभागीय स्पर्धांसाठी उपप्रमुख यादव, पर्यवेक्षक कड आणि कांबळे सर यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.







