उरुळी कांचन, (पुणे) : नायगाव व प्रयागधाम गावच्या हद्दीत रोहीत्रे जमिनीवर खाली पाडून त्यातील तांबे अॅल्युमिनियमच्या तारा व तेल असा तब्बल 2 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांवर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ करण विठ्ठल वाघबिजे (वय 33, रा. चौधरीमाथा, उरुळी कांचन) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ करण वाघबिजे हे 18 ऑगस्ट रोजी नायगाव परिसरात देखभाल-दुरुस्तीच्या कामात व्यस्त असताना, स्थानिक नागरिक संदीप हगवणे आणि शेतकरी विजय शंकर तुपे यांनी फोनवरून रोहीत्र खाली पडल्याची माहिती दिली. माहिती मिळताच महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.

पहिल्या घटनेत नायगाव हद्दीतील हगवणेवस्ती येथील 63 केव्हीए क्षमतेच्या रोहीत्राची वरची बाजू खोलून त्यातील सुमारे 1 लाख 40 हजार रुपये किमतीचे 35 किलो वजनाचे तांब्याचे पट्टे, रॉड आणि 210 लिटर ऑईल चोरट्यांनी लांबवले होते. दुसऱ्या घटनेत विजय तुपे यांच्या शेतातील 16 केव्हीए क्षमतेचे रोहीत्र डीपी स्ट्रक्चरवरून थेट खाली पाडून, त्यातील सुमारे 55 हजार रुपये किमतीचे 15 किलो वजनाच्या अॅल्युमिनियमच्या तारा व 50 लिटर ऑईल सांडवून चोरट्यांनी नुकसान केल्याचे दिसून आले.

दरम्यान, या दोन्ही घटनेत 2 लाख 70 हजार रुपयांचे अतोनात नुकसान झाले. शेतीकामाच्या दिवसांतच विजेचे रोहीत्र फोडल्याने परिसरातील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित झाला असून, पिकांना पाणी देणे कठीण झाले आहे. यामुळे शेतकरी वर्गातून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार सस्ते करत आहेत.







