राहुलकुमार अवचट
यवत : दौंड तालुक्यातील व्यावसायिक ग्राहकांना वस्तू खरेदी केल्यानंतर वस्तू व सेवा कराची पावती देत नाहीत. अशा व्यावसायिकांवर कारवाई करण्याची मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे दौंड शहराध्यक्ष गणेश जगताप यांनी वस्तू व सेवा कर (पुणे) विभागाकडे केली आहे.
दौंड शहर व तालुक्यातील अनेक व्यावसायिक येणाऱ्या ग्राहक राजाला वस्तू व सेवा कराची पक्की पावती देत नसल्याने, खरेदी केलेल्या वस्तूमध्ये काही दोष असेल तर पावती नसल्याने त्यांना न्याय मागता येत नाही. पावती न देणारे व्यावसायिक हे शासनाचा लाखो रुपयांचा कर बुडवताना दिसत आहेत.
काही दिवसांपूर्वी केडगाव येथील बंद असलेल्या टोलनाका परिसरात पशुधनासाठी लागणाऱ्या पशुखाद्याची विक्री करणारा विक्रेता मनमानी पद्धतीने येणाऱ्या शेतकरी ग्राहक राजाकडून अवाजवी शुल्क आकारत आहे. शेतकरी, ग्राहकांनी पावती मागितली असता पावती देण्यास नकार देत आहे, तसेच येणाऱ्या ग्राहकांशी उद्धटपणे वागत आहे. अनेकांनी याबाबत तक्रारी केल्या आहेत.
परिसरातील असे बहुसंख्य छोटे-मोठे व्यावसायिक ग्राहकांना कोणत्याही प्रकारची वस्तू व सेवा कराची पावती देत नाहीत. त्यामध्ये हॉटेल, मिठाई, बेकरी, चायनीज, किराणा माल, रासायनिक खते, बी बियाणे, औषधे व्यावसायिक यांचा समावेश आहे. याबाबतच्या तक्रारी अखिल भारतीय ग्राहक पंचायत, दौंड कार्यालयात प्राप्त झाल्या आहेत.
ग्राहकांना न्याय देण्यासाठी ग्राहक न्यायालय हे खूप मोठे व्यासपीठ आहे; परंतु व्यावसायिक पक्की पावती देत नसल्याने, ग्राहक न्यायालयात सुद्धा ग्राहकांना जाता येत नाही. याचाच अर्थ असा होतो की, ग्राहकांकडून हे व्यावसायिक जीएसटीसह पैसे वसूल करतात; परंतु येणारा जीएसटीचा पैसा शासनाच्या तिजोरीत जमा करता, व्यावसायिक स्वतः मालामाल झालेले आहेत.
दौंड तालुक्यातील पावती न देणाऱ्या व्यवसायिकांवर कठोर कायदेशीर कारवाई करून, ग्राहकांना योग्य तो न्याय द्यावा व केलेल्या कारवाईचा अहवाल सात दिवसांत लेखी स्वरूपात मिळावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली आहे.