योगेश शेंडगे
शिक्रापूर : शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे एका व्यक्तीचा खुन केल्याची घटना घडली होती. ही घटना २७ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास कारेगावच्या हद्दीत भाड्याने दिलेल्या खोल्यांजवळ उघडकीस आली. रामप्रसाद श्रीरघुवीर सिंग (वय-२९, मुळ रा. पौडी, कुंवरपुर, ता. भरतपुर, जि. कोरीया, छत्तीसगढ) असं खून करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत रविंद्र श्रीरघुवीर सिंग यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरून राजेशकुमार चनिराख चौहाण (वय २७) (रा. इसुआ, ता. सरमेरा, जि. नालंदा, राज्य बिहार) याला पोलिसांनी काही तासाच्या आत अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारेगावच्या हद्दीत भाड्याने दिलेल्या खोल्यांजवळ सकाळच्या सुमारास रामप्रसाद श्रीरघुवीर सिंग हा मयत अवस्थेत आढळून आला होता. याबाबत रविंद्र सिंग यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांचा शवविच्छेदन अहवालानंतर सदर व्यक्तीचा मृत्यू डोक्यात मार लागल्याने झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली.
त्यावेळी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये मृत रामप्रसाद सिंग याला राजेशकुमार चौहाण याने लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचे आढळून आले. या घटनेनंतर आरोपी राजेशकुमार चौहाण फरार झाला होता. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत शिरुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर आरोपीचा शोध घेण्यासाठी तीन वेगवेगळी तपास पथके तयार केले.
तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे स्वतंत्र तपास पथक असे चार तपास पथके गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत होते. दरम्यान, आरोपी हा मोबाईल वापरत नसल्याने व त्याचे कोणीही नातेवाईक, मित्र कारेगाव परिसरात राहण्यास नसल्याने या आरोपीचा शोध घेण्याचे आव्हान पोलीसांपुढे निर्माण झाले होते. एमआयडीसी परिसरातील सुमारे २५ ते ३० सीसीटीव्ही तापसल्यानंतर आरोपी राजेशकुमार चौहाण याला रात्री उशिरा शिताफिने ताब्यात घेतले. या घटनेचा अधिक तपास रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अशोक चव्हाण करत आहेत.
ही कामगीरी पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक पंकज देशमुख, पुण्याचे अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, शिरुरचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, सहायक पोलीस निरीक्षक अशोक चव्हाण, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस हवालदार विलास आंबेकर तसेच स्थानिक गुन्हे शाखेतील पथकाने केली.