(Baramati ) बारामती : होळ येथे निरा नदीचे पाणी दूषित झाल्याने नदीतील लाखो माशांचे जीवन धोक्यात आले आहे. जीव वाचविण्यासाठी माशांची तडफड सुरू आहे. नदीतीला सुध्द पाण्याचा शोध माशांकडून घेतला जात आहे. मात्र दूषित पाणी झाल्याने जीव वाचविण्यासाठी त्यांची धडपड सुरु आहे. तर दुसरीकडे याचा फायदा घेत नागरिकांमध्ये तरंगणाऱ्या माशांना जाळ्यात ओढत त्यांना खाण्याची जणू स्पर्धाच लागली आहे.
प्रदूषणाला नेमके जबाबदार कोण..?
नदीच्या पश्चिम बाजूला स्वच्छ पाणी असल्याने तिकडे मासे धाव घेत आहेत. परंतु, दूषित पाण्याने माशांचा मोठ्या प्रमाणावर जीव जात असून, नदीलगत मृत माशांचा खच पडू लागला आहे. निरेच्या प्रदूषणाबाबत सगळेच कारखाने, कंपन्या कानावर हात ठेवत असल्याने या प्रदूषणाला नेमके जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
होळ येथे निरा नदीचे दृश्य पाहिले, तर एकीकडे स्वच्छ पाणी, तर दुसरीकडे कमालीचे दूषित पाणी, असा विरोधाभास दिसून येत आहे. होळच्या बंधार्याच्या वरील बाजूस मुरमाचा बंधारा आहे. तिकडील पाणी स्वच्छ तर होळ, कोर्हाळे खुर्द बाजूकडील पाणी कमालीचे अस्वच्छ व दूषित आहे. या भागाचा खालचा भाग म्हणजे कांबळेश्वर, सांगवी, शिरवली, खांडज, निरावागज हा आहे.
या भागातील दूषित पाण्याबाबत कायम फलटण तालुक्यातील कत्तलखाने, दूध कंपन्यांकडे बोट दाखविले जाते. परंतु, आता वरच्या भागातील होळ परिसरातील या स्थितीला नेमके कोणती कंपनी, कारखाने जबाबदार आहेत, असा सवाल सर्वसामान्य शेतकरी उपस्थित करीत आहेत.
फलटण तालुक्यात सुमारे दोन ते तीन टन मासे रिचवले आहेत. बारामती तालुक्यातही मोठ्या प्रमाणात येथील मासे पकडून त्याची विक्री करण्यात आली. या माशांचे सेवन करणे आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक असले तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात मासे मिळत असल्याने मासे पकडणार्यांची चंगळ झाली आहे. निरेत एवढ्या मोठ्या प्रमाणावर माशांचा खच पडण्याची ही पहिलीच वेळ आहे.