युनूस तांबोळी
शिरूर : काय खरं नाय…गेल्या वर्षी पावसान झोडापलं, औदा रानोमाळ सार गवत सुकून गेलं, मेंढर संभाळायची लय अवघड हाय, कांद्याची पाती मिळत नाय, कोबू कांदा बाजारातून यिकत घ्याव लागतोया, जवळपास तिनशे मेंढर हायती, कस काय परवडणार, त्यात बिबट्याच लय भ्याव हाय…!रातीच्या येळी प्रपंच संभाळायचा की जनावरं…! नुसता जीवाला घोर लागतोया. या अशा
नाराजीच्या प्रतिक्रिया धनगर समाजाच्या मेंढपाळांकडून येऊ लागल्या आहेत.
शिरूर, आंबेगाव, खेड, जुन्नर परिसरात सध्या मेंढपाळ मोठ्या प्रमाणात फिरताना दिसू लागले आहे. साधारण अहमदनगर जिल्ह्यातील ढवळपूरी, साकूर, मांडवा तर त्याही बरोबर पुणे जिल्ह्यातील धनगर समाज मोठ्या प्रमाणात मेंढी पालनाचा व्यवसाय करताना दिसतो. पावसाळ्यात गावाकडे शेत शिवाराची कामे करावयाची. थंडी सुरू झाली की आपला मोर्चा गवताळ भागात, डोंगर घाट
माथ्यावर वळवायचा.
जनावरांबरोबर प्रपंचाचा गाडा तर देवाचा देव्हारा देखील सोबत घेऊन फिरताना ते मेंढपाळ दिसतात.
दिवसभर रानोमाळ काट्या कुट्यात या जनावरांच्या खाद्यासाठी भटकंती करताना ही कुटूंब पहावयास मिळतात. गावा बाहेर किंवा मोकळ्या
शेत शिवारात मुक्काम करून ही कुटूंब आपला वाडा बसवत असतात.
प्रपंचाचा सर्व भार या वाड्यावरच असतो. मेंढर म्हणजेच आमची संपत्ती अस म्हणत दिवसरात्र या पशुपालनासाठी त्यांचा आटापिटा असतो. सध्या कांदा काढणीला अवकाश असून कांदा काढणी सुरू झाली की त्याची पात जनावरांना देण्याकडे कल असतो.
त्यामुळेच या मेंढपाळ व्यवसायांना सध्या तरी रानात फिरावे लागत आहे. सध्या शिरूर, आंबेगाव, खेड, जुन्नर या परिसरात बिबट्याने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. दररोज या मेंढ्यावर होणारे हल्ले हा अतिशय महत्वाचा विषय झाला आहे. या मेंढपाळ व्यवसायीकांच्या पशुपालनावर हल्ला झाल्यावर वनविभागाकडून त्यासाठी नुकसान भरपाई मिळण्यासाठी अनेर समस्यांना सामोरे जावे लागते.
अनेक वेळा बिबट्याने ठार केलेल्या भक्षाचे अवशेष मिळत नसल्याने नुकसान भरपाई मिळत नाही. चारा साठी होणारी भटकंती त्यातून होणारे आर्थिक नुकसान त्या पाठोपाठ बिबट्याच्या हल्ल्यातून कुटूंब भितीच्या वातावरणात असतात. मुक्कामाच्या ठिकाणी अनेकवेळा पुरूष मंडळी नसतात. त्या काळात होणारे बिबट हल्ले खूप भयावह असतात.
लहान लहान मुले व या महिला अतिशय शोर्याने या बिबट्याचा सामना करत असतात. अशा घटना देखील या परिसरात घडल्या आहेत. यामुळे खरे तर
‘बिबट्याचा वावर’…हे यांच्या दृष्टिने महत्वाचा विषय आहे. यासाठी शासन पातळीवर योग्य मदत मिळवून देण्याची जबाबदारी ही वनविभागाने घेतली पाहिजे. अशी मागणी या धनगर समाज्याच्या मेंढपाळ व्यवसायांकडून होऊ लागली आहे.
—————-
मेंढ्यापासून मोठ्या प्रमाणात लोकर व लेंडी खत मिळते. यासाठी शेतकरी त्यांना मोकळ्या शेतात वाडा करून राहण्याची संधी निर्माण करून देतात. लोकरपासून थंडीमध्ये रजई तर लेंडीपासून शेतात खत मिळून उत्पादन वाढीस मदत होते. या कारणाने या मेंढपाळ व्यवसायिकांना बिबट्यापासून बचाव करण्यासाठी मदतीचा हात दिला पाहिजे. यासाठी लवकरच वनविभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलाविण्यात येईल. शेतकरी व मेंढपाळ यांना बिबट्यापासून बचाव करण्यासाठी उपाय शोधून काढण्यात येईल.
– दिलिप वळसे पाटील
माजी गृहमंत्री
मेंढपाळासाठी बिबट्याचा वावर… हा अतिशय गंभीर विषय होत चालला आहे. भविष्यात या व्यवसायिकांसाठी बिबट्यांचा बंदोबस्त करणे अतिशय महत्वाचे आहे. त्यांची संख्या नियंत्रणात राहिली नाही. तर मेंढपाळ व्यवसायिकांचे कुटूंब धोक्यात येतील. त्यातून त्यांचा व्यवसाय बंद पडण्याची शक्यता आहे. यातून त्यांच्या अर्थकारणावर परिणाम होईल.
– राजेंद्र गावडे
संचालक, घोडगंगा सहकारी
साखर कारखाना
हिवाळा आणि उन्हाळा या काळात मेंढपाळाची भटकंती सुरू असते. पावसाळ्यात त्यांना अनेक अडचणिना सामोरे जावे लागते. गारांच्या पावसाने झोडपून मेंढ्याचा मृत्यू अशा घटना गेल्या वर्षी घडल्या होत्या. सध्या बिबट्यांच्या भीतीने हे व्यवसायीक मोठ्या अडचणीत सापडले आहे. या बिबट्यांचा बंदोबस्त होणे गरजेचे आहे. त्यातून या मेंढपाळ व्यवसायीकांना आधार मिळेल.
– अरूणा घोडे
माजी पंचायत समिती सदस्य