उरुळी कांचन, (पुणे) : पूर्व हवेलीतील महिलांच्या आर्थिक सबलीकरणाचा भक्कम पाया ठरलेल्या ‘अस्मिता महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थे’ची 25 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच अत्यंत उत्साहात पार पडली. आर्थिक वर्ष 2025 -26 मध्ये संस्थेने उत्कृष्ट आर्थिक कामगिरी नोंदवत 45 लाख 79 हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे. या घवघवीत नफ्यातून सभासदांना 15 टक्के लाभांश देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा संस्थेच्या संस्थापिका तथा चेअरमन प्रतिभा महादेव कांचन यांनी केली.

संस्थेने सभासदांच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन 21 कोटी 47 लाख रुपयांचे कर्जवाटप केले आहे. तसेच संस्थेची विविध क्षेत्रातील 8 कोटी 5 लाख रुपयांची गुंतवणूक आहे. यामध्ये संस्थेच्या एकूण ठेवी सुमारे 25 कोटी रुपये जमा असून यामध्ये एकूण सभासद संख्या 4 हजार 281 इतकी झाली आहे.

संस्थेच्या २५ वर्षांच्या यशस्वी आणि गौरवशाली प्रवासाचे औचित्य साधून रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त संस्थेच्या सर्व 4 हजार 281 सभासदांना आकर्षक प्रवासी बॅग भेट म्हणून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संस्थेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून सभासदांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण आहे.

आपल्या अध्यक्षीय भाषणात चेअरमन प्रतिभा महादेव कांचन म्हणाल्या, “संस्थेच्या या 25 वर्षांच्या यशस्वी वाटचालीत सभासद, ठेवीदार, कर्जदार आणि निष्ठावंत कर्मचाऱ्यांचे योगदान अतिशय मोलाचे आहे. सभासदांनी दाखवलेल्या अखंड विश्वासामुळेच संस्था ‘अ’ वर्ग ऑडिटसह प्रगतीची शिखरे गाठत आहे. भविष्यातही महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि त्यांच्या उन्नतीसाठी विविध सभासदकेंद्रित कल्याणकारी योजना राबवण्याचा आमचा मानस आहे.”







