दौंड : दौंड शहरातील बोरावके नगर परिसरातील युवा व्यावसायिक अमोल सुभाष साळुंखे यांच्या खुनाचा उलगडा करण्यात दौंड पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले असून याप्रकरणी आणखी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. अमोल साळुंखे यांच्या खुनातील आरोपींची संख्या दोन झाली आहे. अशी माहिती दौंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोपाल पवार यांनी दिली.
महेश गणेश काळे (वय 33, रा. बोरावकेनगर, गोपाळवाडी, दौंड. मूळ रा. अजनुज, श्रीगोंदा), असे सुरुवातीला अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गणेश मोरे (रा. मोरे वस्ती) याला रात्री उशिरा अटक करण्यात आली अशी माहिती दौंड पोलिसांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, दौंड (बोरावके नगर) येथील युवा व्यावसायिक अमोल सुभाष साळुंखे यांचा अज्ञात व्यक्तीने लिंगाळी कडे जाणाऱ्या रस्त्यावर खून केला होता. सदर घटनेचा स्थानिक गुन्हे शाखा व दौंड पोलीस तपास करीत असताना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या माहितीवरून व्यावसायिक भागीदार महेश काळे याला सुरुवातीला ताब्यात घेतले.
त्याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्याने सांगीतले की, अमोल हा आपल्याला भागीदारीतून बाहेर काढणार असल्याचा महेश याला संशय आला आणि त्याने रागाच्या भरात अमोल याच्या डोक्यात लाकडी दांडक्याने प्रहार करीत खून केला अशी महिती दिली.
दरम्यान, पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने त्याचा साथीदार गणेश मोरे याच्या सहाय्याने खून केल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार आरोपी गणेश मोरे याला दौंड पोलिसांनी अटक केली आहे. अमोल साळुंखे खून प्रकरणी आरोपींची संख्या दोन झाली आहे.
सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली दौंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोपाल पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल गावडे ,सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, पोलीस कर्मचारी पांडुरंग थोरात, सुभाष राऊत, नितीन बोराडे, अमीर शेख ,निखिल जाधव ,पांढरे ,बापू रोटे, कोठावळे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे सचिन घाडगे, असिफ शेख, योगेश नागरगोजे ,अजित भुजबळ, राजू मोमीन ,यांच्या पथकाने कामगिरी केली. यांच्या पथकाने केली आहे.