अक्षय टेमगिरे
रांजणगाव गणपती : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील अरणगाव येथील ठोंबरेवस्तीत अज्ञात दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकत वृद्ध दाम्पत्याला मारहाण करून सोन्याचांदीचे दागिने आणि रोख रक्कम लुटल्याची घटना घडली होती. ही घटना रविवारी १७ मार्च रोजी मध्यरात्री घडली होती. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर, वृद्ध आनंदा सावळेराम ठोंबरे (वय ७०) हे गंभीर जखमी झाले होते.
त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. गेली सहा दिवसापासून मृत्यूशी झुंज देणारे आनंदा ठोंबरे यांच्या लढ्याला यश आले नसून अखेर उपचारादरम्यान सहाव्या दिवशी त्यांचे निधन झाले. आज २३ मार्च रोजी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास वृद्ध आजोबांची प्राणज्योत मालवली.
दरम्यान, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, शिरूर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, शिक्रापूर पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आजिनाथ शिंदे, पोलीस हवालदार किशोर तेलंग, अमोल दांडगे, संदीप कारंडे, लहानु बांगर, आत्माराम तळवले, रोहिदास पाखरे, विकास पाटील, लखन शिरसकर, जयराज देवकर, पोलीस पाटील संतोष लेंडे यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली.
पुढील तपास शिक्रापूर पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पवार आणि पोलीस नाईक, अमोल नलगे हे करत आहेत.