लोणी काळभोर , (पुणे) : हवेली तालुक्यात संभाव्य दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा प्रभावीपणे सामना करता यावा, यासाठी पंचायत समिती हवेलीने कंबर कसली आहे. जलसंधारण, मृदसंधारण, पाणी पुनर्भरण आणि चारा व्यवस्थापन अशा विविध उपाययोजनांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या कामांसाठी नाम फाउंडेशन आणि बायफ संस्थांनी सहकार्याची तयारी दर्शविली आहे. दरम्यान, तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करावा, या मागणीसाठी पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची भेट घेऊन निवेदन दिले.

हवेली पंचायत समिती सभापती युवराज काकडे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता. 02) दुष्काळ निवारण नियोजन बैठक पार पडली. या बैठकीत अस्तित्वातील बंधाऱ्यांचे खोलीकरण, नवीन बंधाऱ्यांची उभारणी, ओढे-नाल्यांचे खोलीकरण व अस्तरीकरण, वनराई बंधारे, विहिरी आणि बोअरवेलचे पुनर्भरण अशा कामांचे नियोजन करण्यात आले. तसेच पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत जिरविण्यासाठी शासकीय इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग व्यवस्था करण्याचा निर्णय घेण्यात आला.
लघुपाटबंधारे विभागाच्या माध्यमातून बंधाऱ्यांची कामे हाती घेण्यात येणार असून, कृषी विभाग जलसंधारण आणि मृदसंधारणाच्या योजनांची अंमलबजावणी करणार आहे. तालुक्यातील प्रत्येक गावात शाळा, महाविद्यालये आणि तरुण मंडळांच्या सहभागातून वनराई बंधारे उभारण्याचेही नियोजन आहे.

‘जलतारा’ प्रकल्पातून भूजल पुनर्भरण
जमिनीतील नैसर्गिक पाणीसाठा वाढविण्याच्या उद्देशाने ‘जलतारा’ प्रकल्प राबविण्यात येणार आहे. पंचायत समिती हवेली, कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे आणि नाम फाउंडेशन यांच्या सहकार्याने हा उपक्रम सुरू होणार असून, पुढील आठवड्यापासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती सभापती युवराज काकडे यांनी दिली.
नाम फाउंडेशनचे मल्हार नानासाहेब पाटेकर यांनी जलसंधारणाच्या कामांसाठी जेसीबी यंत्र नाममात्र दरात उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली. बायफ संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. मनोज कुमार आवारे यांनी चारा व्यवस्थापन आणि पशुधन संवर्धनाबाबत मार्गदर्शन केले. आदर पूनावाला फाउंडेशनच्या प्रतिनिधींनी शुद्ध पाणीपुरवठ्याशी संबंधित उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागाचे आश्वासन दिले.
दरम्यान, पाणी व्यवस्थापन, जलसंधारण, मृदसंधारण आणि चारा व्यवस्थापनाबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्हा परिषद शाळा व महाविद्यालयांमध्ये निबंध, चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. विजेत्यांना प्रमाणपत्रे व पारितोषिके देऊन प्रोत्साहन दिले जाणार आहे.
हवेलीला दुष्काळग्रस्त तालुक्याचा दर्जा देण्याची मागणी
बैठकीनंतर उपस्थित पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची भेट घेतली. संभाव्य दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता हवेली तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. त्यामुळे तालुक्यातील पाणीटंचाई आणि शेतीशी संबंधित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे.
या बैठकीस गटविकास अधिकारी शेखर शेलार, नाम फाउंडेशनचे मल्हार पाटेकर, आदर पूनावाला क्लीन सिटीचे व्यवस्थापक मल्हार करवंदे, बायफचे शास्त्रज्ञ डॉ. मनोज कुमार आवारे, पंचायत समिती सदस्य रूपाली कोंडे, किरण साकोरे, सुदर्शन चौधरी, मनोज चौधरी, युवराज वांजळे, सुषमा मुरकुटे, राणी वाळके, मोनिका कंद, शुभांगी खिरीड, कोमल कांबळे, अमोल टेकाळे यांच्यासह कृषी, लघुपाटबंधारे, बांधकाम, पशुसंवर्धन आणि नरेगा विभागांचे अधिकारी उपस्थित होते.







