उरुळी कांचन, ता. 14 : पुणे-सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती आणि कुंजीरवाडी परिसरातील वाहतूक कोंडीच्या जटील समस्येला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. ‘पुणे प्राईम न्यूज’ने या प्रश्नाचा वारंवार आवाज उठवला होता. प्रशासनाने सोमवारी (ता. 13) प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली असून या नव्या नियोजनामुळे महामार्गावरील अपघातांचा धोका कमी होऊन प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.

महामार्गावरील नायगाव चौक आणि फुरसुंगीकडे जाणारा चौक हे वाहतूक कोंडीचे प्रमुख केंद्र बनले होते. या ठिकाणी विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी वाहनांच्या मैलोन्मैल रांगा लागत असत. परिसरातील नर्सरी, सिमेंट पाईप कंपन्या आणि इतर उद्योगांमुळे होणारी अवजड वाहनांची रेलचेल कोंडीत भर घालत होती. ही समस्या सोडवण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी व उरुळी कांचनचे माजी सरपंच संतोष कांचन यांनी हडपसर वाहतूक पोलीस व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे (NHAI) वारंवार पाठपुरावा केला होता.
वाहतूक शाखेच्या सूचनेनुसार, नायगाव फाटा आणि कुंजीरवाडी चौकातील सध्याचे दोन्ही धोकादायक दुभाजक (डिव्हायडर) कायमस्वरूपी बंद करण्यात आले आहेत. त्याऐवजी वाहतूक सुरळीत करण्यासाठी तीन ठिकाणी नवीन डिव्हायडर तयार केले जाणार आहेत. त्यामध्ये कुंजीर लॉन्स समोर, मोरया वन सोसायटीसमोर, भारत बेंझ शोरूम (जुने) पतसंस्थे शेजारी अशा ठिकाणी हे नवीन डिव्हायडर सुरक्षिततेच्या सर्व निकषांनुसार तयार केले जाणार असून, वाहनांना वळण घेण्यासाठी (U-Turn) पुरेसा रस्ता उपलब्ध करून दिला जाणार आहे. यामुळे अपघातांचा धोका कमी होऊन वाहनांचा वेगही कायम राखता येणार आहे. हे नवीन दुभाजक ‘यू-टर्न’ (U-Turn) घेण्यासाठी पुरेसे प्रशस्त असून, त्यामुळे वाहनांना वळण घेताना होणारी कसरत थांबणार आहे.
दरम्यान, या मोहिमेत वाहतूक उपायुक्त हिंमत जाधव, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र करनकोट यांचे तांत्रिक मार्गदर्शन लाभले. नव्या दुभाजकांमुळे महामार्गावरील वाहनांचा वेग कायम राहील आणि अपघातांचे प्रमाण शून्यावर येईल, अशी आशा परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
उरुळी कांचन पॅटर्नची चर्चा
यापूर्वी उरुळी कांचन येथील गंभीर वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी यशस्वी पाठपुरावा करून ‘उरुळी कांचन पॅटर्न’ राबवला होता. त्याच धर्तीवर आता नायगाव आणि कुंजीरवाडीचा प्रश्न मार्गी लावला जात असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
आळंदी म्हातोबा, नायगाव, पेठसह परिसरातील नागरिकांची नायगाव येथील दुभाजक बंद करण्याची मागणी खूप दिवसांपासून होती. त्यानुसार वरिष्ठांशी पत्रव्यवहार करून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे (NHAI) वारंवार पाठपुरावा सुरु ठेवला. त्यानुसार पोलीस अधिकारी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी सदर ठिकाणी भेट देऊन पाहणी केली होती. त्या पाठपुराव्यानुसार दुभाजक बंद करण्यात आले आहेत.
-राजेंद्र करणकोट, पोलीस निरीक्षक, हडपसर वाहतूक शाखा
पुणे पोलीस वाहतूक उपायुक्त हिंमत जाधव, हडपसर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार करून भेट घेतली होती. वारंवार पाठपुरावा सुरु ठेवला होता. त्यामुळे सोमवारी (ता. 13) वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी आदेश काढला व दोन ठिकाणावरील दुभाजक बंद करण्याचा श्रीगणेशा करण्यात आला.
-सुदर्शन चौधरी, संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती हवेली







