पुणे: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका असल्याचा दावा करणारे एक निनावी पत्र बीड पोलिसांना मिळाल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या पत्रात रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका असल्याचा उल्लेख करण्यात आल्याचे समोर आले असून, या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून प्राथमिक चौकशी सुरू आहे.

दरम्यान, या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना रुपाली चाकणकर यांनी संबंधित आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी म्हटले की, कोणतीही शहानिशा न करता निनावी पत्र माध्यमांपर्यंत पोहोचवून त्यावरून चर्चा घडवून आणली गेली, हा बदनामी करण्याचा कुटील डाव आहे. हे पत्र नेमके कुणी लिहिले आणि ते माध्यमांपर्यंत कसे पोहोचले, याची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
याच पार्श्वभूमीवर, भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणानंतर चाकणकर यांच्यावर विरोधकांकडून विविध आरोप करण्यात आले होते. त्यांच्या आणि खरात यांच्यात आर्थिक संबंध होते का, याची चौकशी करावी तसेच त्यांना अटक करावी, अशी मागणीही करण्यात आली होती. या सर्व घडामोडींमुळे चाकणकर काही काळ माध्यमांपासून दूर राहिल्या होत्या. जवळपास 28 दिवसांनंतर त्यांनी या प्रकरणावर सविस्तर भूमिका मांडली आहे.
दरम्यान, बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी स्पष्ट केले की, नाव आणि पत्ता नसलेल्या निनावी पत्राला कायदेशीरदृष्ट्या फारसे महत्त्व देता येत नाही. तरीही, अशा प्रकारचे पत्र कोणी आणि कोणत्या हेतूने लिहिले, याचा तपास होणे आवश्यक आहे. या प्रकरणामुळे राजकीय आरोप-प्रत्यारोपांना पुन्हा सुरुवात झाली असून, निनावी पत्रामागील सत्य बाहेर येण्याची मागणी आता जोर धरत आहे.







