शिरूर: शिरूर शहर व परिसरात मोठी खळबळ उडवून देणाऱ्या आनंद नागरी पतसंस्थेच्या कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक फसवणूक प्रकरणात शिरूर पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल ८ आरोपींना अटक केली आहे.ठेवीदारांच्या पैशांचा अपहार, बनावट कागदपत्रे तयार करणे आणि विश्वासघात केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून,अटकेत घेतलेल्या आरोपींमध्ये शहरातील काही प्रतिष्ठित व्यापारी व व्यक्तींचा समावेश असल्याने व्यापारी वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणातील प्रमुख सूत्रधार मात्र अद्याप फरार असून, “मोठा मासा पोलिसांच्या जाळ्यात कधी अडकणार?” अशी चर्चा सध्या शिरूर शहरात रंगत आहे. याबाबत अपर विशेष लेखापरीक्षक (वर्ग-२) सहकारी संस्था,पुणे येथील संजयकुमार सखाराम पुंडे (वय ५६) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या पुरवणी जबाबानुसार आणि तपासातून उघड झालेल्या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये विनयकुमार वसंतलाल संघवी (वय ४८, रा. आनंद सोसायटी, शिरूर), भरतकुमार रतनलाल चोरडिया (वय ५६), मनोज पोपटराव मुसुडगे (वय ५०), वल्लभ मनसुखलाल साखला (वय ३८), सुरेशकुमार शांतीलाल बोरा (वय ७१), कांतीलाल बाळासो होळकर (वय ६५, रा. सादलगाव, ता. शिरूर) तसेच दोन महिलांचा समावेश आहे.
प्राथमिक तपासानुसार, शिरूर येथील आनंद नागरिक सहकारी पतसंस्था मध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाला असून, ठेवीदारांच्या कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याचे उघड झाले आहे. या संदर्भात शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० नुसार फसवणूक, विश्वासघात, बनावट कागदपत्रे बनवणे, गुन्हेगारी कट रचणे या अंतर्गत विविध प्रकारचे गुन्हे शिरूर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आले आहेत.
दरम्यान, या कारवाईमुळे शिरूर तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून, ठेवीदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. फरार मुख्य आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी विशेष पथक नेमले असून, लवकरच या गैरव्यवहारातील मुख्य आरोपींनाही अटक करण्यात येईल. असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शिरूरचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.







