हडपसर, ता. २७ : हडपसर परिसरात अंगणात लहान मुलीसोबत खेळत बसलेल्या १६ वर्षीय मुलावर चौघांनी अचानक हल्ला करत लोखंडी हत्याराने गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे ससाणेनगर परिसरात खळबळ उडाली असून, जखमी मुलावर सध्या ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ओमकार रविंद्र कांबळे (वय १६, रा. पांढरे मळा, ससाणेनगर रोड, हडपसर) याने याबाबत जबाब दिला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता. २६) सायंकाळी पाचच्या सुमारास ओमकार हा आपल्या घराच्या अंगणात शेजारच्या लहान मुलीसोबत खेळत बसला होता. त्यावेळी अचानक तीन ते चार इसम तेथे आले आणि कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांनी ओमकारवर लोखंडी हत्याराने हल्ला चढवला.

या हल्ल्यात ओमकारच्या पाठीवर आणि डाव्या हाताच्या मनगटावर गंभीर मार लागला. जखमी अवस्थेत त्याला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याने पोलिसांना दिलेल्या जबाबात हल्लेखोरांची नावे ‘पिल्या’, ‘दादू’, ‘राज’ आणि ‘अनिश’ अशी असल्याचे सांगितले आहे.

दरम्यान, हडपसर पोलिसांनी आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ११८(२), शस्त्र अधिनियम २५(४) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १३५, ३७(१) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मांडवे करीत आहेत.







