चाकण, (पुणे) : रक्षाबंधनाच्या सणासाठी मुलीला घेऊन निघालेल्या कुटुंबावर काळाने घाला घातला. शिंदे (ता. खेड) गावाजवळ शुक्रवारी (ता. 28) सायंकाळी ट्रक आणि दुचाकीची भीषण धडक झाली. या अपघातात वडील आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर आई गंभीर जखमी झाली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

राजेंद्र बंडा भोर (वय-42) आणि त्यांची मुलगी मयुरी राजेंद्र भोर (वय -15) अशी मृतांची नावे आहेत. पत्नी वैशाली राजेंद्र भोर (वय-36) या गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भोर कुटुंबीय मूळचे अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील असून, सध्या निरगुडसर येथे वास्तव्यास होते.
महाळुंगे इंगळे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास किंगफा कंपनीजवळ हा अपघात झाला. राजेंद्र भोर हे व्यवसायाने चालक होते. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ट्रकचालकाने अपघातानंतर ट्रक रस्त्यावरच थांबवला. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, मयुरी नववी इयत्तेत शिकत होती. रक्षाबंधनानिमित्त ती आपला भाऊ मयूर याला राखी बांधण्यासाठी मावळ तालुक्यातील मिंढेवाडी येथे मामाच्या घरी जात होती. मयूर शिक्षणासाठी तेथेच राहत होता. भावाला राखी बांधण्यासाठी आनंदाने निघालेल्या मयुरीला मात्र वाटेतच काळाने गाठले. त्यामुळे भाऊ-बहिणीची रक्षाबंधनाची भेट अधुरीच राहिली. राजेंद्र यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील, पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.








