पुणे : पिंपरी-चिंचवडजवळील गहुंजे येथील ‘लोढा बेलमोंडो’ या गृहप्रकल्पातील एका बंद फ्लॅटमध्ये एका 34 वर्षीय युवतीचा मृतदेह अत्यंत खराब झालेल्या अवस्थेत सापडला आहे. मुग्धा अविनाश देशमुख असे या मृत तरुणीचे नाव असून त्या छत्रपती संभाजीनगर येथील महापालिकेच्या निवृत्त मुख्य अभियंत्यांच्या मुलगी होत्या.

मुग्धा या जुलै 2025 मध्ये उच्चशिक्षणासाठी (एमबीए) लंडनला गेल्या होत्या. तेथून त्या नियमितपणे आपल्या कुटुंबीयांच्या संपर्कात असायच्या. मात्र, 23 ऑक्टोबर 2026 नंतर त्यांच्याशी अचानक संपर्क तुटला. काळजीपोटी कुटुंबीयांनी लंडनमध्ये त्यांच्या मित्रांकडे चौकशी केली असता, त्यांनी ऑगस्ट 2026 मध्येच लंडन सोडल्याची धक्कादायक बाब समोर आली. भारतात परतल्याची माहिती त्यांनी कुटुंबाला दिली नव्हती. त्यामुळे पालकांनी छत्रपती संभाजीनगरच्या उस्मानपुरा पोलीस ठाण्यात मुग्धा बेपत्ता झाल्याची नोंद केली.
तपासादरम्यान पोलिसांनी मुग्धा यांच्या डिजिटल व्यवहार आणि बँक खात्यांची पाहणी केली. तेव्हा भारतात ब्लिंकिट, झोमॅटो आणि स्विगी यांसारख्या सेवांवर त्यांच्या क्रेडिट कार्डचा वापर सुरू असल्याचे निष्पन्न झाले. या तांत्रिक माहितीच्या आधारे पोलीस गहुंजे येथील सोसायटीतील फ्लॅटवर पोहोचले. फ्लॅट बाहेरून बंद असल्याने बनावट चावीच्या साहाय्याने तो उघडण्यात आला. तेथील बेडरूममध्ये पोलिसांना मुग्धा यांचा कुजलेला मृतदेह आढळला.

शिरगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांच्या माहितीनुसार, मुग्धा ऑगस्ट 2026 पासून या फ्लॅटमध्ये एकट्याच राहत होत्या आणि त्यांनी 21 ऑक्टोबरला आपल्या घरकामाच्या बाईलाही कामावरून काढून टाकले होते. सध्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून व्हिसेरा सुरक्षित ठेवण्यात आला आहे. फॉरेन्सिक तपास आणि वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले असून घटनेचा सखोल तपास सुरू आहे








