पुणे: पुणेकरांची बहुप्रतीक्षित पुणे मेट्रो लाईन-3 अखेर प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या मार्गावरील मेट्रोचे लोकार्पण 3 नोव्हेंबर 2026 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. त्यानंतर 4 नोव्हेंबरपासून सकाळी 6 वाजता नियमित प्रवासी वाहतूक सुरू होईल. सुरुवातीच्या टप्प्यात या मार्गावरील 23 पैकी 17 स्थानके प्रवाशांसाठी खुली केली जाणार आहेत.

म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सकाळी 10.30 वाजता लोकार्पण सोहळा होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची यावेळी उपस्थिती असणार आहे. पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
पुणेरी मेट्रो किंवा पिंक लाईन म्हणून ओळखली जाणारी ही मार्गिका 23.203 किलोमीटर लांबीची असून पूर्णपणे उन्नत आहे. माण येथून सुरू होणारी ही मेट्रो हिंजवडी आयटी पार्क, बालेवाडी, औंधमार्गे शिवाजीनगरला पोहोचणार आहे. या प्रकल्पासाठी भूसंपादन आणि इतर कामांसह अंदाजे 8,313 कोटी रुपये खर्च झाला आहे. सार्वजनिक-खासगी भागीदारीतून राबविण्यात आलेला हा देशातील पहिलाच मेट्रो प्रकल्प असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सध्या सुरू होणाऱ्या 17 स्थानकांपैकी 7 स्थानकांवर एक जिना, तर उर्वरित 10 स्थानकांवर दोन्ही जिने प्रवाशांसाठी खुले असतील. उर्वरित 6 स्थानकांचे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येणार आहे. त्यापैकी 13 आणि 14 क्रमांकाच्या स्थानकांचे काम नोव्हेंबर 2026 अखेरपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. तर अन्य 4 स्थानके जानेवारी 2027 पर्यंत सेवेत आणण्याचे नियोजन आहे.

गर्दीच्या वेळेत दर 6 मिनिटांनी मेट्रो
मेट्रोची पहिली फेरी दररोज सकाळी 6 वाजता सुरू होईल. माण येथून जिल्हा न्यायालयाच्या दिशेने जाणारी शेवटची गाडी रात्री 10.30 वाजता, तर जिल्हा न्यायालयातून माणकडे जाणारी शेवटची गाडी रात्री 11.40 वाजता सुटेल. गर्दीच्या वेळेत दर 6 मिनिटांनी आणि इतर वेळेत दर 12 मिनिटांनी मेट्रो उपलब्ध असेल. जिल्हा न्यायालय स्थानकावर या मार्गिकेची जोडणी महामेट्रोच्या लाईन-1 आणि लाईन-2 शी करण्यात आली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड, स्वारगेट, वनाज आणि रामवाडीच्या दिशेने प्रवास करणे अधिक सोयीचे होणार आहे.
प्रवाशांसाठी महामेट्रो आणि लाईन-3 चे संयुक्त तिकीट ॲप तयार करण्यात आले आहे. मेट्रो स्थानकांबाहेर पीएमपीएमएल बस, रिक्षा, ओला-उबर टॅक्सी आणि ई-बाईकची सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्थाही करण्यात आली आहे. अल्स्टॉमच्या वातानुकूलित गाड्यांमध्ये मोबाईल आणि लॅपटॉप चार्जिंगची सोय असेल.
या मार्गिकेवरील गाड्या सुमारे 100 महिला ट्रेन पायलट चालवणार आहेत. तसेच स्थानकांवरील कर्मचाऱ्यांमध्ये महिलांचे प्रमाण जवळपास 50 टक्के असणार आहे. स्थानकांच्या सुरक्षेसाठी 350 सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत.
पर्यावरणपूरक सुविधांवरही या प्रकल्पात भर देण्यात आला आहे. स्थानके आणि कार डेपो मिळून 7.60 मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीची क्षमता उभारण्यात आली आहे. यामुळे मेट्रोच्या एकूण वीज गरजेपैकी सुमारे 30 टक्के वीज सौर ऊर्जेतून मिळेल. बांधकामात पर्यावरणपूरक साहित्य वापरल्याने सुमारे 28 हजार टन कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन टळल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. याशिवाय 2 हजार टन स्टील आणि 60 कोटी लिटर पाण्याची बचत झाली आहे. प्रकल्पामुळे बाधित झालेल्या झाडांच्या बदल्यात 5,500 नवीन झाडे लावण्यात आली असून 750 झाडांचे पुनर्रोपण करण्यात आले आहे.
हिंजवडी आयटी पार्क, बाणेर, बालेवाडी, औंध, गणेशखिंड रस्ता आणि शिवाजीनगर परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ही मेट्रो महत्त्वाची ठरणार आहे. दररोज सुमारे 2 ते 2.5 लाख प्रवासी या सेवेचा लाभ घेतील, असा अंदाज पीएमआरडीएने व्यक्त केला आहे. त्यामुळे आयटी क्षेत्रात काम करणारे कर्मचारी आणि शहरातील नागरिकांचा प्रवास अधिक जलद व सोयीस्कर होण्याची अपेक्षा आहे.







