पुणे, ता. 14 : पुणे शहरात वाढत्या अंमली पदार्थांच्या (ड्रग्ज) तस्करीवर आळा घालण्यासाठी विमानतळ पोलिसांनी अत्यंत कौशल्यपूर्ण आणि धडक कारवाई करत एम.डी. ड्रग्ज विक्री करणाऱ्या दोघांना 8 एप्रिलला सायंकाळी सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल 26 लाख 71 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, शहरातील ड्रग्ज रॅकेटला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

विमानतळ पोलीस ठाण्याचे तपास पथक हद्दीत पेट्रोलिंग करत होते. यावेळी पोलीस कर्मचारी हरी पुंडे व लालु कन्हे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, जनक बाबा दर्गा चौक, खराडी बायपास येथून फॉरेस्ट पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यावर एक इसम एम.डी. ड्रग्ज विक्रीसाठी येणार आहे. मिळालेल्या माहितीची खातरजमा करून ही बाब पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद शेळके यांना कळविण्यात आली. त्यांनी तत्काळ कारवाईचे आदेश दिले.
यानंतर पोलिसांनी सापळा रचत संशयित इसम प्रितम प्रफुल्ल कुलकर्णी (वय 37, रा. साईनाथ नगर, वडगावशेरी, पुणे) याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून 3.59 ग्रॅम एम.डी. ड्रग्ज पावडर आणि एक मोटारसायकल जप्त करण्यात आली. आरोपीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवली.
पुढील चौकशीत उबेद अन्सार खान (वय 27, रा. हडपसर, पुणे) याचा या प्रकरणात सहभाग उघड झाला. त्यानुसार पोलिसांनी खुळेवाडी परिसरात सापळा रचून त्यालाही अटक केली. त्याच्याकडून 4 ग्रॅम एम.डी. ड्रग्ज पावडर आणि एक स्कॉर्पिओ कार जप्त करण्यात आली. या संपूर्ण कारवाईदरम्यान पोलिसांनी एम.डी. ड्रग्जसह वाहने असा एकूण 26 लाख 71 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड हे करत असून, या रॅकेटमागील इतर आरोपींचा शोधही सुरू आहे.
ही धडक कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त सोमय मुंडे व सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद शेळके यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक नितीन राठोड, तसेच पोलीस कर्मचारी लालु कन्हे, हरीप्रसाद पुंडे, अंकुश जोगदंडे, योगेश थोपटे, रुपेश पिसाळ, सचिन मांजरे, राहुल जोशी, प्रशांत सुतार, सागर कासार, अंबादास चव्हाण आदींच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पूर्ण केली.







