पुणे: पुणे जिल्ह्यात मतदार यादी सखोल पुनरिक्षण कार्यक्रम (SIR) मोहिम 2026 अंतर्गत कामकाजात झालेल्या गंभीर दुर्लक्षाबाबत प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) आणि त्यांच्या पर्यवेक्षकांविरोधात कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले असून, याबाबत तातडीने अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

विभागीय आयुक्त, पुणे विभाग आणि जिल्हा निवडणूक अधिकारी, पुणे यांच्या बैठकीत दिलेल्या सूचनांनुसार 10 एप्रिल 2026 पर्यंत 2002 च्या मतदार यादीतील मतदारांचा 2024 च्या यादीत शोध घेऊन Table Top Mapping आणि Progeny Mapping पूर्ण करणे अपेक्षित होते. या संदर्भात 203 भोर विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी यांनीही वेळोवेळी सूचना दिल्या होत्या.
मात्र, कर्णवडी येथील मतदान केंद्र क्रमांक 406 साठी नियुक्त BLO कडून अपेक्षित काम पूर्ण झाले नसल्याचे आढळून आले आहे. 13 एप्रिल 2026 अखेर Table Top Mapping केवळ 85 टक्के पूर्ण झाले असून Progeny Mappingचे काम पूर्णपणे शून्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी या कामातील विलंबाबाबत गंभीर नाराजी व्यक्त केली आहे.
प्रशासनाने संबंधित अधिकारी आणि पर्यवेक्षकांना 15 एप्रिल 2026 पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे अंतिम निर्देश दिले आहेत. तसेच काम पूर्ण न झाल्यास संबंधित BLO विरुद्ध लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1950 च्या कलम 32 अंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
याशिवाय, ठरलेल्या मुदतीनंतरही कामात प्रगती दिसून न आल्यास संबंधितांवर पोलिसांत गुन्हा नोंदवून त्याचा अहवाल तात्काळ सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ही मोहीम वेळेत पूर्ण करणे बंधनकारक असून, कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही प्रशासनाने दिला आहे.






