पुणे: पुण्यातील खराडी परिसरात क्षुल्लक कारणावरून घडलेल्या वादातून एकाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रात्रपाळीत काम करत असताना ‘आधी कोण झोपणार?’ या कारणावरून दोन सुरक्षारक्षकांमध्ये वाद होऊन त्याचे रूपांतर थेट हत्येत झाले.

पांडुरंग खारवणे (वय 52, रा. मांजरी बुद्रुक) आणि सुदर्शन काळे (वय 22, रा. खराडी) हे दोघे एका सोसायटीत सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होते. 12 एप्रिल रोजी रात्री दोघांची एकत्र रात्रपाळी होती. त्यांनी रात्री 12 ते सकाळी 6 या वेळेत आळीपाळीने 3-3 तास झोप घेण्याचे आधीच ठरवले होते. मात्र रात्री उशिरा ‘आधी कोण झोपणार?’ यावरून दोघांमध्ये बाचाबाची सुरू झाली.
सुरुवातीला साधा वाद असलेला हा प्रकार हळूहळू चिघळत गेला. दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली आणि रागाच्या भरात सुदर्शन काळे याने आपल्या गळ्यातील गमजा काढून खारवणे यांच्या गळ्याला घट्ट आवळला. या घटनेत खारवणे काही क्षणातच खाली कोसळले आणि बेशुद्ध झाले.
घडलेला प्रकार पाहून आरोपी घाबरला आणि त्याने स्वतः पोलीस कंट्रोल रूमला फोन करून माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत खारवणे यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी पोलिसांनी सुदर्शन काळे याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. क्षुल्लक कारणावरून घडलेल्या या घटनेमुळे संताप आणि चिंता व्यक्त केली जात असून अशा घटनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज व्यक्त होत आहे.







