लोणी काळभोर : दहावीची परीक्षा दिलेल्या एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत बुधवारी (ता.8 ) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे लोणी काळभोर परिसरातील एका शैक्षणिक संकुलात सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. ते कदमवाकवस्ती परिसरात आपल्या कुटुंबासोबत राहतात. फिर्यादी यांना तीनही मुली आहेत. त्यांची मोठी मुलगी व पत्नी एका खाजगी ठिकाणी काम करतात. तर धाकटी मुलगी हडपसर परिसरातील एका नामांकित महाविद्यालयात तंत्रज्ञानाचे उच्च शिक्षण घेत आहे.
फिर्यादी हे बुधवारी (ता.९) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास कामाला गेले होते. तेव्हा त्यांची दहावीची परीक्षा दिलेली मुलगी एकटी घरी होती. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांची धाकटी मुलगी महाविद्यालयातून घरी आली, तेव्हा घराला बाहेरून कडी लावलेली आढळून आले. तेव्हा धाकट्या मुलीने लहान बहिणीचा शोध घेतला असता, ती आढळून आली नाही. त्यानंतर मुलीने तत्काळ या घटनेची माहिती वडिलांना दिली.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच, वडील तातडीने घरी आले. लहान मुलीचा सर्वत्र व नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र मुलगी कोठेही आढळून आली नाही. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अल्पवयीन मुलगी असल्याचा फायदा घेऊन तिला फूस लावून पळवून नेले, अशी फिर्याद मुलीच्या वडिलांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किरण धायगुडे करीत आहेत.