पुरंदर: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या पुरंदर तालुक्यातील दुष्काळ पाहणी दौऱ्यात चोरट्यांनी शिरकाव केल्याचा प्रकार समोर आला आहे. शेतकऱ्यांच्या भेटीसाठी आलेल्या पवारांच्या स्वागतासाठी जमलेल्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी कार्यकर्त्यांचे खिसे कापून पैसे चोरल्याची घटना वाल्हे येथे घडली. ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने संशयितांचा माग काढत कार्यकर्ते आणि पोलिसांनी दोघांना नीरा येथे पकडले. हे दोघे माळशिरस परिसरातील सराईत चोरटे असल्याची माहिती समोर आली आहे.

शरद पवार यांनी शुक्रवारी (ता. 02) पुरंदर तालुक्यातील मांडकी, वाल्हे आणि राख या दुष्काळग्रस्त भागांचा दौरा करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. वाल्हे येथे त्यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी जमली होती. या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी हात साफ केला. दौरा पुढे गेल्यानंतर वाल्हेचे माजी सरपंच अमोल खवले यांचे 5 हजार 820 रुपये, तर राजेंद्र पवार यांचे 19 हजार रुपये चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.

या प्रकारानंतर खवले यांनी तातडीने ग्रामपंचायतीतील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये संशयित चोरटे पवार यांच्या ताफ्यातील एका वाहनात बसल्याचे दिसून आले. फुटेजमधील माहिती कार्यकर्त्यांना पाठवण्यात आली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी संशयित वाहनाचा माग काढण्यास सुरुवात केली. वाहन ताफ्याबाहेर जाऊ नये, यासाठी कार्यकर्त्यांनी त्याच्या पुढे आणि मागे स्वतःची वाहने ठेवून सतर्कता दाखवली.

दौऱ्याचा ताफा नीरा येथे पोहोचल्यानंतर स्थानिक कार्यकर्ते आणि पोलिसांनी संशयितांवर लक्ष ठेवले. यावेळी पुन्हा चोरीचा प्रयत्न करत असताना दोघांना नागरिक आणि पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पुढील तपासासाठी त्यांना जेजुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
दरम्यान, चोरट्यांचा शोध घेण्यात वाल्हे ग्रामपंचायतीचे सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचे ठरले. फुटेजमुळे संशयितांचे चेहरे आणि त्यांनी प्रवास केलेल्या वाहनाची माहिती मिळाल्याने त्यांचा माग काढणे शक्य झाले. कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे दौऱ्यादरम्यान चोरीच्या घटनांतील संशयितांना पकडण्यात यश आले.







