सोलापूर : कायमच्या दुष्काळामुळे संपूर्ण गाव विक्रीस काढण्याचा इशारा देणाऱ्या माढा तालुक्यातील तुळशी ग्रामस्थांच्या पाणीप्रश्नावर अखेर तोडगा काढण्याचे आश्वासन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले आहे. तुळशी येथे झालेल्या ग्रामसभेत गोरे यांनी जानेवारीपर्यंत पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक कामे सुरू केली जातील, असे सांगितले. त्यांच्या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी घोषणाबाजी करत जल्लोष केला.

तुळशी ग्रामस्थांनी गेल्या काही दिवसांपासून पाणीटंचाई आणि दुष्काळाच्या प्रश्नावर विविध आंदोलने केली होती. मात्र, मागण्या पूर्ण होत नसल्याने ग्रामस्थांनी अखेर सप्टेंबरच्या अखेरीस संपूर्ण गाव विक्रीस काढल्याचे फलक लावले. या आंदोलनाची राज्यभर चर्चा झाल्यानंतर प्रशासनाने ग्रामस्थांशी संवाद साधण्यास सुरुवात केली. जिल्हाधिकाऱ्यांनीही ग्रामस्थांशी चर्चा केली होती.
आता पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी तुळशी गावाला भेट देऊन पाणीप्रश्नावर उपाययोजनांची माहिती दिली. पहिल्या टप्प्यात पिण्याच्या पाण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून साडेतीन कोटी रुपयांची योजना मंजूर करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच तुळशीसह परिसरातील कायम दुष्काळी असलेल्या सात ते आठ गावांचा समावेश सीना-माढा उपसा सिंचन योजनेत करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या योजनेसाठी आवश्यक परवानगी जानेवारीपर्यंत मिळवण्याचेही आश्वासन देण्यात आले.

सीना-माढा योजनेचा एकूण खर्च ९७६ कोटी रुपये असला तरी तुळशी आणि परिसरातील गावांसाठी स्वतंत्रपणे २२ कोटी रुपयांचे टेंडर काढून दुष्काळग्रस्त भागाला प्राधान्याने पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे गोरे यांनी सांगितले. आचारसंहिता लागू असल्याने सध्या कामांना सुरुवात करता येणार नाही. आचारसंहिता संपल्यानंतर तातडीने कामे सुरू केली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

तुळशी गावात गेल्या ३५ ते ४० वर्षांपासून पिण्याच्या तसेच शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी सीना-माढा उपसा सिंचन योजनेचे पाणी गावाला मिळावे, अशी मागणी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुळशीच्या प्रश्नाकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना दिल्याचेही गोरे यांनी सांगितले.







