हडपसर : मित्राच्या भावाच्या लग्नाच्या स्वागत समारंभातून घरी परतणाऱ्या दोन तरुणांवर सय्यदनगर परिसरात मध्यरात्री धारदार शस्त्राने हल्ला करून दगड आणि लाकडी बांबूने मारहाण केल्याची घटना घडली. या हल्ल्यात खालिद शेख आणि अल्तमश सय्यद हे दोघे जखमी झाले असून, दुचाकीचेही नुकसान झाले आहे. याप्रकरणी अरफान जावेद पठाण (वय 20, रा. वडगाव शेरी, पुणे) याच्याविरोधात काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडे दिलेल्या माहितीनुसार, खालिद शेख हा मित्र अल्तमश सय्यद याच्यासोबत सय्यदनगर येथील आशियाना हॉलमध्ये लग्नाच्या स्वागत समारंभासाठी 22 ऑक्टोबरच्या रात्री गेला होता. कार्यक्रम संपल्यानंतर 23 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास दोघेही दुचाकीवरून घरी जात होते. त्यावेळी गल्ली क्रमांक तीनमधील लिमरा हायस्कूलजवळ दोन व्यक्तींमध्ये मोठ्याने वाद सुरू असल्याचे त्यांना दिसले.
काय प्रकार सुरू आहे, हे पाहण्यासाठी दोघे थांबले असता, त्यांच्यातील एका व्यक्तीने शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. त्यानंतर दोघे तेथून निघत असताना संबंधित व्यक्तीने त्यांच्या दुचाकीच्या मागील बाजूस धारदार शस्त्राने वार केला. त्यामुळे दुचाकीचा तोल जाऊन दोघेही रस्त्यावर पडले. त्यानंतर खालिदच्या कमरेच्या डाव्या बाजूला धारदार शस्त्राने वार करण्यात आला, तर त्याच्या डोक्यावर तसेच अल्तमशच्या छातीवर आणि पायावर दगडाने मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. खालिदला लाकडी बांबूनेही मारहाण केल्याचा आरोप आहे.

या हल्ल्यातून दोघांनी कसाबसा पळ काढला. त्यानंतर पोलिसांना 112 क्रमांकावर फोन करून घटनेची माहिती देण्यात आली. जखमी खालिदला प्रथम साने गुरुजी रुग्णालयात आणि त्यानंतर ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, झटापटीत अल्तमशचा मोबाईल हरवला असून, दुचाकीचेही नुकसान झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.








