खेड : सोसायटीचे मेंटेनन्स थकल्याच्या कारणावरून रहिवाशांच्या पाच फ्लॅटचे पिण्याच्या पाण्याचे कनेक्शन तोडल्याचा प्रकार राजगुरुनगर येथील सूरज होम्स सोसायटीमध्ये घडला. याप्रकरणी गंगाराम बुधा तळपे याच्याविरुद्ध खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोसायटीच्या मेंटेनन्सच्या थकबाकीबाबत बैठक 23 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर पाणी भरण्यावरून रहिवासी आणि सोसायटीतील काही सदस्यांमध्ये वाद झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. संबंधित रहिवाशांनी यापूर्वी भरलेल्या पाणी, स्वच्छता आणि वीजबिलाच्या खर्चाची माहिती दिली होती. तसेच थकीत मेंटेनन्सची रक्कम भरण्यास तयारी दर्शविल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, 25 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सोसायटीतील काही सदस्यांनी पाच फ्लॅटच्या पाण्याच्या पाइपची पाहणी केली. त्यानंतर गंगाराम तळपे याने मेंटेनन्स थकबाकीचे कारण देत पिण्याच्या पाण्याचे कनेक्शन तोडल्याचा आरोप प्राजक्ता शिवळे यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत केला आहे.

या प्रकरणी महाराष्ट्र मालकी फ्लॅट (बांधकाम, विक्री, व्यवस्थापन आणि हस्तांतरण प्रचाराचे नियम) अधिनियम, 1963 – 12 A(6) ; भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023 – 324(4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास खेड पोलीस करीत आहेत.







