लोणी काळभोर: कुंजीरवाडी येथून दोन महिन्यांपूर्वी अचानक बेपत्ता झालेल्या 30 वर्षीय तरुणाच्या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. लखन सिंकदर चंदनशिवे (वय 30 , रा. कुंजीरवाडी) याचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची शक्यता व्यक्त करत त्याचा भाऊ अमर चंदनशिवे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लखन हा चालक म्हणून काम करीत होता. 12 जुलै 2026 रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास तो कुंजीरवाडी येथील घरातून कोणालाही काही न सांगता बाहेर पडला. त्यापूर्वी घरात काही कारणावरून वाद झाला होता. लखनच्या भावाने त्याला समजावून सांगितल्यानंतर तो घराबाहेर निघून गेला. मात्र, त्यानंतर तो पुन्हा घरी परतला नाही. सुरुवातीला लखन यापूर्वीही कोणाला काही न सांगता घराबाहेर जात असे आणि काही दिवसांनी परत येत असे, त्यामुळे कुटुंबीयांनी तो पुन्हा परत येईल, अशी अपेक्षा केली. मात्र, चार-पाच दिवस उलटूनही तो घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला.

कुंजीरवाडी, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, उरुळी कांचन, थेऊर तसेच हडपसर परिसरात प्रत्यक्ष जाऊन कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला. नातेवाईकांकडेही फोन करून चौकशी केली. मात्र, लखनचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही. त्यामुळे 20 ऑगस्ट रोजी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात त्याच्या बेपत्ता होण्याची तक्रार देण्यात आली होती. हरविलेल्या व्यक्तींच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याबाबत वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी लखनच्या बेपत्ता प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही केली. त्यानंतर त्याचा भाऊ अमर सिंकदर चंदनशिवे यांनी पोलिसांना जबाब दिला.

दरम्यान, लखनला दारूचे व्यसन असून तो यापूर्वीही दारू पिऊन बाहेर राहत असल्याचे कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले आहे. मात्र, दोन महिन्यांहून अधिक काळ उलटूनही त्याचा ठावठिकाणा लागत नसल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली आहे. लखनला अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणातून अपहरण करून गुप्तपणे डांबून ठेवले असावे, अशी शक्यता व्यक्त करत अमर चंदनशिवे यांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध कायदेशीर तक्रार दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.







