मुंबई: दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोन्याची मागणी वाढण्याची शक्यता असतानाच सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. या आठवड्यात 24 कॅरेट सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम तब्बल 3,500 रुपयांपर्यंत घट झाली आहे. दागिन्यांसाठी मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या 22 कॅरेट सोन्याच्या दरातही सुमारे 3,200 रुपयांची घसरण नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात सोने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही नरमाई पाहायला मिळाली. 1 ऑक्टोबर रोजी औद्योगिक मागणीत घट झाल्याने चांदीच्या दरावर दबाव आला. एका किलो चांदीच्या किमतीत थेट 5,000 रुपयांची घट नोंदवण्यात आली. देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय सराफा बाजारात मौल्यवान धातूंच्या किमतीवर दबाव कायम असून अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या आगामी पतधोरण बैठकीकडे बाजाराचे लक्ष लागले आहे.

28 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या फेडरल रिझर्व्हच्या बैठकीत व्याजदरासंदर्भात काय निर्णय घेतला जातो, याचा सोन्याच्या किमतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील व्याजदरांबाबतची अनिश्चितता आणि गुंतवणूकदारांकडून सुरू असलेली नफावसुली यामुळे सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वी फेडकडून व्याजदर वाढण्याची शक्यता जवळपास 70 टक्के मानली जात होती. मात्र अमेरिकेतील महागाईचे आकडे अपेक्षेपेक्षा कमी आल्यानंतर ही शक्यता आता सुमारे 22 टक्क्यांवर आली आहे.

सध्या दिल्ली, लखनऊ आणि जयपूरमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 1,49,330 रुपये प्रति 10 ग्रॅम असून 22 कॅरेट सोन्याचा दर 1,36,900 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याचा दर 1,12,040 रुपये आहे. मुंबई, कोलकाता, बंगळुरू आणि हैदराबादमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,49,180 रुपये, 22 कॅरेट 1,36,750 रुपये आणि 18 कॅरेट 1,11,890 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. पाटणा आणि अहमदाबादमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 1,49,230 रुपये आहे. 22 कॅरेटसाठी 1,36,800 रुपये, तर 18 कॅरेटसाठी 1,11,940 रुपये मोजावे लागत आहेत. फेडने व्याजदर कायम ठेवले तर सोन्यावरील दबाव काहीसा कमी होण्याची शक्यता बाजार विश्लेषकांकडून व्यक्त केली जात आहे.








