आदित्य बोराटे

इंदापूर: इंदापूर तालुक्यातील वरकुटे बुद्रुक येथे अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख १ लाख ३० हजार रुपयांवर डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीत एकूण १ लाख ६५ हजार रुपयांचा ऐवज लंपास झाला आहे. बुधवारी (दि.१४) पहाटे साडेपाच वाजण्यापूर्वी ही घटना घडली. याप्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत नितीन बापू सोनवणे (वय ३४, व्यवसाय शेती, रा. वरकुटे बुद्रुक, ता. इंदापूर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, अज्ञात चोरट्याने घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून घरात प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने, चांदीचे पैंजण आणि रोख रक्कम चोरून नेली.

चोरीस गेलेल्या ऐवजात १० हजार रुपये किमतीच्या दोन ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या कानातील रिंगा, १५ हजार रुपये किमतीचे तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी मंगळसूत्र, १० हजार रुपये किमतीचे चार भार वजनाचे चांदीचे दोन पैंजण आणि ५०० रुपयांच्या २६० नोटांच्या स्वरूपातील १ लाख ३० हजार रुपयांची रोकड यांचा समावेश आहे. या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत १ लाख ६५ हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ६५७/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०५(अ) अन्वये बुधवारी रात्री ७ वाजून २९ मिनिटांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार रासकर करीत आहेत.







