उरुळी कांचन (पुणे) : शाळेच्या ग्राऊंडवर आणि चक्क स्टाफ रूममध्ये विद्यार्थिनीच्या अंगावर हात फिरवून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याची घटना घडली. सोरतापवाडी (ता. हवेली) हद्दीतील पुरोगामी माध्यमिक विद्यालयात मंगळवारी (ता. 13) दुपारी पाऊणे तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी नराधम शिक्षकाविरुद्ध उरुळी कांचन पोलीस ठाण्यात पॉक्सोसह गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला तात्काळ बेड्या ठोकल्या आहेत.

विकासवर्धन बाबुराव वाघमारे (रा. नायगाव ता. हवेली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या नराधम शिक्षकाचे नाव आहे. याबाबत उरुळी कांचन पोलीस ठाण्यात वाघमारे याच्याविरुद्ध पॉक्सोसह गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोरतापवाडी हद्दीतील ‘पुरोगामी माध्यमिक विद्यालय’ येथे विकासवर्धन बाबुराव वाघमारे (रा. नायगाव, ता. हवेली) हा शिक्षक म्हणून कार्यरत आहे. बुधवारी (ता. 10) दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास शाळेच्या मैदानावर या शिक्षकाने सदर मुलीच्या पाठीवर आणि हातावर हात फिरवून अयोग्य वर्तन केले. एवढ्यावरच न थांबता नराधमाने मंगळवारी (ता. 13) दुपारी पाऊणे तीन वाजण्याच्या सुमारास शाळेच्या स्टाफ रूममध्ये बोलावून किंवा तिथे असताना, त्याने विद्यार्थिनीच्या कमरेवर, पाठीवर आणि गालावर हात फिरवला.

दरम्यान, शिक्षकाने वारंवार केलेल्या या विकृत व असभ्य प्रकारामुळे संबंधित विद्यार्थिनी प्रचंड मानसिक दबावाखाली आली होती. तिने घडलेला प्रकार घरी सांगितल्यानंतर पालकांनी तत्काळ उरुळी कांचन पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेल्या प्रकाराची तक्रार नोंदवली. या प्रकरणी पीडित विद्यार्थिनीच्या फिर्यादीवरून आरोपी शिक्षक विकासवर्धन वाघमारे याच्याविरोधात उरुळी कांचन पोलीस ठाण्यात पॉक्सोसह गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक बापूसाहेब मत्रे करीत आहेत.







