पुणे : पोलिसांना अनेक दिवस चकवा देणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला अखेर येरवडा परिसरातून अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, तो आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी लक्ष्मीनगर भागात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्याच ठिकाणी सापळा रचून त्याला पकडण्यात आले. निखील मधुकर कांबळे (वय 22, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

कांबळे याच्याविरुद्ध यापूर्वी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कारवायांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्र झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यानुसार (MPDA) त्याला स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार त्याला एक वर्षासाठी कारागृहात ठेवण्याची प्रक्रिया करण्यात येणार होती. मात्र, आदेश जारी झाल्यानंतर कांबळे पोलिसांसमोर हजर झाला नाही. तो फरार झाल्याने पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला होता.
गुप्त माहितीमुळे आरोपी अडकला

दरम्यान, येरवडा परिसरात गस्त घालत असताना तपास पथकातील पोलीस कर्मचारी राहुल परदेशी, अक्षय शिंदे आणि किरण भागीत यांना महत्त्वाची माहिती मिळाली. कांबळे हा मैत्रिणीला भेटण्यासाठी लक्ष्मीनगर परिसरात येणार असल्याचे त्यांना समजले. पोलिसांनी या माहितीची दखल घेत तातडीने त्या भागात सापळा लावला. ठरल्याप्रमाणे कांबळे परिसरात पोहोचताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

ही कारवाई पोलीस उपायुक्त चिलुमूला रजनीकांत आणि सहायक पोलीस आयुक्त सुनील जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे, पोलीस निरीक्षक अमर कदम, दिलीपकुमार वेडे, सहायक पोलीस निरीक्षक निखील पवार यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.






