पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात भाजपच्या नगरसेवकांची बैठक घेत त्यांच्या कामकाजाचा आढावा घेतल्याची माहिती समोर आली आहे. आगामी शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बैठकीत फडणवीस यांनी नगरसेवकांना सक्रिय होण्याच्या सूचना दिल्या. तसेच, प्रत्येकाच्या कामाचे रिपोर्ट कार्ड तपासले जाईल, असे स्पष्ट केल्याचे वृत्त आहे.

बुधवारी मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक आणि अन्य महत्त्वाच्या बैठका पार पडल्यानंतर फडणवीस पुण्याच्या दौऱ्यावर आले. त्याआधी त्यांनी तळेगावातील एका खासगी कार्यक्रमाला उपस्थिती लावली. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि माजी मंत्री जयंत पाटील हेही उपस्थित होते. कार्यक्रमानंतर फडणवीस पुण्यात पक्षाच्या संघटनात्मक बैठकीसाठी दाखल झाले.

बैठकीत फडणवीस यांनी नगरसेवकांना त्यांच्या कामाचा हिशेब देण्यास सांगितल्याची माहिती आहे. भविष्यात पदाची मागणी करताना संबंधित नगरसेवकाने किती आणि कसे काम केले, याचा आढावा घेतला जाईल. त्यानंतरच पुढील निर्णयाचा विचार केला जाईल, असा संदेश त्यांनी दिल्याचे वृत्त आहे.

नगरसेवकांनी केवळ पदावर न राहता प्रत्यक्ष कामात सक्रिय व्हावे, मतदारांशी संपर्क वाढवावा आणि पक्षाच्या संघटनात्मक कामाला प्राधान्य द्यावे, यावर बैठकीत भर देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
आगामी शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांसाठीही फडणवीस यांनी नगरसेवकांना सूचना दिल्याची माहिती आहे. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, मतदारांपर्यंत पोहोचावे आणि निवडणुकीच्या कामासाठी सर्वांनी उपलब्ध राहावे, असे त्यांनी सांगितल्याचे वृत्त आहे.
या दोन्ही निवडणुकांमध्ये पक्षाच्या उमेदवारांच्या विजयासाठी संघटितपणे काम करण्याचे आवाहनही करण्यात आल्याचे समजते.
दरम्यान, पुणे महानगरपालिकेतील कामकाजाबाबत काही नगरसेवकांनी बैठकीत नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. महापालिकेत एककल्ली पद्धतीने कारभार सुरू असल्याची तक्रार त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्याचे वृत्त आहे. या तक्रारींची मुख्यमंत्री काय दखल घेतात आणि पुढे कोणती पावले उचलतात, याकडे आता लक्ष लागले आहे.







