उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. कोरेगाव मूळ येथून 17 वर्षीय मुलगी, तर उरुळी कांचन येथील आश्रमरोड परिसरातून 16 वर्षीय मुलगी बेपत्ता झाली आहे. दोन्ही मुलींना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कशाचे तरी आमिष दाखवून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी दोन्ही कुटुंबियांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 वर्षीय मुलीचे कुटुंबीय कोरेगाव मूळ येथे राहत असून शेतात शेतमजुरी करतात. सोमवारी (ता. 09) नेहमीप्रमाणे घरातील व्यक्ती कामावर गेल्या असताना मुलगी घरीच होती. सकाळी अकराच्या सुमारास घरी आले असता मुलगी दिसून आली नाही. परिसरात तसेच मूळ गावी नातेवाइकांकडे शोध घेऊनही ती मिळून आली नाही. त्यामुळे तिला कोणीतरी आमिष दाखवून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेत 16 वर्षीय मुलगी ही चार महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशातून आह्रम रोड परिसरात राहणाऱ्या भावाकडे राहण्यासाठी आली होती. रविवारी (ता. 8) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ती कोणालाही काही न सांगता घरातून निघून गेली. याबाबत तिच्या भावाला पत्नीने फोन करून माहिती दिली. त्यानंतर कुटुंबीयांनी घर परिसर, उरुळी कांचन परिसर आणि रेल्वे स्थानक परिसरात तिचा शोध घेतला. तसेच नातेवाइकांकडे आणि पुण्यात काम करणाऱ्या गावातील लोकांकडे चौकशी केली. मात्र, ती मिळून आली नाही.

दरम्यान, या दोन्ही घटनांप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात स्वतंत्र तक्रार नोंदविण्यात आली आहे. पहिल्या प्रकरणात पोलीस हवालदार लोखंडे, तर दुसऱ्या प्रकरणात ग्रेड पोलीस उपनिरीक्षक मत्रे तपास करीत आहेत.








