उरुळी कांचन : उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील ‘जिओ मार्ट’ या मॉलमधून ऑनलाइन ऑर्डर केलेल्या लहान मुलांच्या चॉकलेट आणि बिस्किटांमध्ये चक्क मुदतबाह्य झालेले खाद्यपदार्थ पाठवण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लहान मुलांच्या जीवाशी खेळणाऱ्या या बेजबाबदार कारभाराविरुद्ध उरुळी कांचन येथील जागरूक नागरिक योगेश कांचन यांनी आक्रमक पवित्रा घेत मॉल प्रशासनाला धारेवर धरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (ता. 13) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचन येथील ‘जिओ मार्ट’ या मॉलमधून लहान मुलांसाठी खाऊ म्हणून चॉकलेट्स आणि बिस्किटांची ऑनलाइन ऑर्डर नोंदवण्यात आली होती. ऑर्डर घरपोच आल्यानंतर वस्तूंची तपासणी केली असता, त्यातील काही चॉकलेट आणि बिस्किटांच्या पाकिटांवरील वापराची अंतिम तारीख 02 नोव्हेंबर 2026 रोजीच संपून गेल्याचे निदर्शनास आले. अकरा दिवसांपूर्वी मुदतबाह्य झालेले हे खाद्यपदार्थ नष्ट करण्याऐवजी मॉल व्यवस्थापनाने विक्रीसाठी तसेच ठेवले होते आणि ते थेट ग्राहकांना देण्यात आले.
लहान मुले सहसा पाकिटावरील तारीख न पाहता चॉकलेट आणि बिस्किटे खातात. हा गंभीर प्रकार लक्षात येताच योगेश कांचन यांनी तात्काळ उरुळी कांचन येथील जिओ मार्ट गाठले आणि मुदतबाह्य झालेले सर्व प्रॉडक्ट्स माघारी नेऊन दिले. “ग्राहकांच्या आरोग्याशी आणि विशेषतः लहान मुलांच्या जीवाशी खेळण्याचा हा अत्यंत निंदनीय प्रकार उरुळी कांचन येथील जिओ मार्टमध्ये सुरू आहे,” असा थेट व आक्रमक आरोप योगेश कांचन यांनी यावेळी केला.

अन्न व औषध प्रशासन कारवाई करणार का?

मोठ्या ब्रँडच्या नावाखाली जर अशा प्रकारे मुदतबाह्य मालाची विक्री होत असेल, तर सर्वसामान्य ग्राहकांनी विश्वास कोणावर ठेवायचा. या मॉलमधील इतर खाद्यपदार्थांचीही कसून तपासणी होणे गरजेचे असून, अन्न व औषध प्रशासन आणि स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन संबंधित मॉल व्यवस्थापनावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी कांचन यांनी केली आहे.
याबाबत बोलताना योगेश कांचन म्हणाले, “उरुळी कांचन सारख्या मोठ्या शहरामध्ये अशा सर्व सामान्यांचा जीवाशी खेळल जातंय असे मुदतबाह्य साहित्य त्यांच्या मशीन मधून स्कॅन झाल्याशिवाय पुढे पाठवत नाहीत. ही चूक नसून हे जाणून बुजून केल जातंय आणि यांच्यावर योग्य ती कठोर कारवाई झाली पाहिजे लहान मुलांचा आरोग्याशी खेळायचा यांना काही अधिकार नाही यांच्याविरुद्ध योग्य ती कारवाई होण्याकरिता ग्राहक कोर्टा मध्ये तक्रार करणार आहे.






