पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत दिल्लीत महत्त्वाच्या बैठकांचे सत्र सुरू झाले असून, यामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. राजधानी दिल्लीमध्ये खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची एक महत्त्वाची भेट पार पडली. सुमारे 35 मिनिटे चाललेल्या या बैठकीत दोन्ही गट एकत्र येण्याबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या भेटीनंतर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यातही स्वतंत्र चर्चा झाली. या सलग बैठकांमुळे दिल्लीत विलीनीकरणाचा काही नवीन फॉर्म्युला निश्चित होणार का, असा प्रश्न राजकीय जाणकारांकडून विचारला जात आहे.
या सर्व घडामोडींची सुरुवात प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार यांच्या भेटीनंतर झाली होती. तेव्हापासूनच दोन्ही पक्ष एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरला होता. मात्र, या विषयावर यापूर्वी सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. आपल्यापर्यंत असा कोणताही प्रस्ताव आला नसून या संदर्भात कोणाशीही बोलणे झालेले नाही, असे त्यांनी म्हटले होते. तसेच, भावाच्या निधनानंतरच्या काही दिवसांत घडलेल्या घडामोडींमुळे आपण स्वतःच विलीनीकरणाच्या विषयावर पडदा टाकला असल्याचे वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केले होते.

सुप्रिया सुळे यांच्या त्या विधानानंतर हा विषय मागे पडल्याचे वाटत होते. परंतु, आता दिल्लीत स्वतः सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यात 35 मिनिटे चर्चा झाल्याने या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. या बैठकांचा नेमका काय परिणाम होतो आणि आगामी काळात कोणती नवीन राजकीय समीकरणे पाहायला मिळतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.







