पुणे : राज्यातील तरुणांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये तब्बल 13,980 रिक्त पदे भरण्यासाठी प्रशासनाने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. या भरतीमध्ये प्रामुख्याने वाहनचालक आणि यांत्रिकी म्हणजेच मेकॅनिकल विभागातील कर्मचाऱ्यांची निवड केली जाणार आहे. ही संपूर्ण भरती प्रक्रिया कंत्राटी पद्धतीने राबवण्यात येणार आहे.

राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी या भरती प्रक्रियेला गती देण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. महामंडळाचा कारभार अधिक सक्षम करण्यासाठी आणि प्रवाशांना उत्तम सेवा देण्यासाठी या कर्मचाऱ्यांची नियुक्ती आवश्यक आहे. ही संपूर्ण निवड प्रक्रिया कोणत्याही दबावाशिवाय, अत्यंत पारदर्शकपणे आणि सर्व कायदेशीर नियमांचे पालन करूनच पूर्ण केली जाईल, अशी ग्वाही महामंडळाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, या भरतीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तरुणांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. एसटी महामंडळात नोकरी लावून देण्याचे खोटे आश्वासन देऊन काही खासगी संस्था आणि दलाल बेरोजगार उमेदवारांची आर्थिक लूट करत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. नोकरीच्या आमिषाने कोणीही पैशांची मागणी केल्यास त्याला अजिबात बळी पडू नका, असे कळकळीचे आवाहन एसटी प्रशासनाने केले आहे.

उमेदवारांनी केवळ महामंडळाच्या अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवावा. कोणतीही अधिकृत जाहिरात किंवा माहिती प्रसिद्ध झाल्यास ती योग्य माध्यमांतून समोर येईल. त्यामुळे दलालांपासून दूर राहून स्वतःच्या पात्रतेवर विश्वास ठेवावा, असेही प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे. या मोठ्या भरतीमुळे राज्यातील हजारो तरुणांना रोजगाराची नवीन संधी उपलब्ध होणार असून, एसटीच्या ताफ्यालाही मोठे बळ मिळणार आहे.







