पुणे : सर्वसामान्य नागरिकांच्या घरगुती बजेटवर पुन्हा एकदा महागाईचा मोठा ताण पडणार आहे. राज्यातील सर्वच प्रमुख ब्रँडच्या दुधाचे दर आता प्रति लिटर 4 रुपयांनी वाढणार आहेत. गाय आणि म्हशीच्या अशा दोन्ही प्रकारच्या दुधाच्या विक्री दरात ही वाढ लागू होणार असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे.

वाढत्या उत्पादन खर्चामुळे हा निर्णय घेणे भाग पडल्याचे दूध उत्पादक संघटनांनी स्पष्ट केले आहे. डिझेल आणि साखरेच्या किमतीत झालेली मोठी वाढ, डीलर्सचे कमिशन दर आणि राज्याबाहेरील दूध कंपन्यांकडून वाढलेली तीव्र स्पर्धा या कारणांमुळे दूध व्यवसाय आर्थिक संकटात सापडला होता. त्यामुळे खर्चाचा ताळमेळ बसवण्यासाठी ही दरवाढ अपरिहार्य असल्याचे उत्पादकांचे म्हणणे आहे.
पुण्यातील कात्रज डेअरीच्या कार्यालयात आज यासंदर्भात एक महत्त्वाची बैठक पार पडली. दूध उत्पादक व व्यावसायिक कल्याणकारी संघाने या बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत राज्यातील तब्बल 45 सहकारी आणि खाजगी दूध संघांचे प्रतिनिधी एकत्र आले होते. सविस्तर चर्चेनंतर सर्वच ब्रँडच्या दुधाचे दर प्रति लिटर 4 रुपयांनी वाढवण्यावर एकमत झाले.

दैनंदिन जीवनातील अत्यंत आवश्यक असलेल्या दुधाचे दर एकाच वेळी 4 रुपयांनी वाढल्याने गृहिणींचे आर्थिक गणित कोलमडण्याची शक्यता आहे. चहा, कॉफी आणि इतर दुग्धजन्य पदार्थांच्या किमतीवरही याचा अप्रत्यक्ष परिणाम होऊ शकतो. या निर्णयामुळे राज्यातील लाखो ग्राहकांना आता दुधासाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत.







