नाशिक : आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असतानाच नाशिक रोड रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) मोठी कारवाई केली आहे. ‘ऑपरेशन सतर्क’ अंतर्गत एका संशयित तरुणाच्या बॅगेतून तब्बल १ कोटी ४८ लाख ६४ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. रोकड कुठून आणली आणि ती कोणाची आहे, याबाबत समाधानकारक माहिती किंवा वैध कागदपत्रे सादर करता न आल्याने संबंधित तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छठपूजेच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांवर विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. गुरुवारी नाशिक रोड रेल्वे स्थानकावर अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये तपासणी सुरू असताना ही कारवाई करण्यात आली. ट्रेन क्रमांक २२११२ मधील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर बॅग घेऊन जाणाऱ्या एका तरुणाला आरपीएफ जवानांनी संशयावरून थांबवले.
संबंधित तरुणाच्या बॅगेची तपासणी केली असता त्यामध्ये ५००, २०० आणि १०० रुपयांच्या नोटांमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड आढळली. ही रक्कम मोजली असता तब्बल १ कोटी ४८ लाख ६४ हजार रुपये असल्याचे समोर आले.

संशयित तरुणाचे नाव संदीप बाळासाहेब भामरे असून तो मूळचा सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथील रहिवासी आहे. सध्या तो जळगावमधील भवानी पेठ परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली आहे.

एवढी मोठी रोकड कुठून आणली, ती कोणाची आहे आणि रेल्वेने तिची वाहतूक करण्यामागील उद्देश काय, अशी विचारणा आरपीएफ जवानांनी तरुणाकडे केली. मात्र, त्याला समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. तसेच रोकडसंदर्भातील वैध कागदपत्रेही तो सादर करू शकला नाही.
त्यामुळे आरपीएफने त्याला ताब्यात घेतले असून रोकडच्या स्रोतासह संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. या कारवाईमुळे नाशिक रोड रेल्वे स्थानकावरील सुरक्षा तपासणीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.






